हत्तीपायाचे साडेअकरा हजार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:12 IST2019-02-24T00:11:30+5:302019-02-24T00:12:15+5:30
हत्तीपाय समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र प्रशासनाकडून नुकत्याच राबविलेल्या हत्तीरोग रुग्ण शोधमोहिमेत जिल्ह्यात हत्तीपायाचे ११ हजार ६७७ रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हत्तीपायाचे साडेअकरा हजार रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : हत्तीपाय समूळ नष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र प्रशासनाकडून नुकत्याच राबविलेल्या हत्तीरोग रुग्ण शोधमोहिमेत जिल्ह्यात हत्तीपायाचे ११ हजार ६७७ रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे अर्धेअधिक रुग्ण मूल, सावली, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, ब्रह्मपुरी या धानपट्यात आढळून आल्याने धानपट्टयात जनजागृतीची अधिक गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते. जून महिना लागला की धानपट्यात पºहे टाकले जातात. त्यानंतर शेतीची मशागत केली जाते. त्यानंतर पाऊस पडला की, धानाची रोवणी केली जाते. ही कामे चिखलातच केली जातात. घाण पाणी शेतात असते. हे वातावरण क्यूलेक्स डासाच्या मादीस पोषक ठरत आहे. त्यामुळे धानपट्ट्यात मागील काही वर्षांत हत्तीरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.
दरवर्षी १६ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत हत्तीरोग रुग्ण शोधमोहीम राबविली जाते. या शोधमोहिमेत ११ हजार ६७७ रुग्ण हत्तीरोगाचे आढळून आले. तर पाच हजार ९३३ रुग्ण अंडवृद्धी असलेले आढळून आले.
जिल्ह्यात पंधरा तालुके आहेत. यात एक हजार ६०८ गावांचा समावेश आहे. त्यातील २२८ गावे हत्तीरोगाकरिता संवेदनशील आहेत. ही गावे धानपट्ट्यातील आहेत. संवेदनशील असलेल्या गावात राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथकामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. डासांचा चावा टाळणे हा रोगप्रतिबंधाचा एक प्रकार आहे. वाढत्या हत्तीपायाच्या रोगाला टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष अशा जनजागृती मोहिम राबविण्याची गरज आहे.
सोमवारपासून हत्तीरोग दुरीकरण मोहीम
जिल्ह्यात २५ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत हत्तीरोग दुरीकरणाकरिता सामूहिक औषधोपचार मोहीम राबविली जाणार आहे. मोहिमेअंतर्गत हत्तीरोग जंतुविरोधी डीईसी औषधांसोबतच जंतुनाशक अलबेंडाझोल या औषधांची मात्रा खाऊ घालावयाची आहे. २००४ पासून सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहीम सुरू आहे. यामुळे हत्तीरोगाचा जंतूभार ३.७१ वरून १.१७ पर्यंत कमी झाला. या मोहिमेसाठी आठ हजार ८७९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी घरोघरी जाऊन वयोगटानुसार गोळ्या देणार आहेत.
अशी घ्यावी काळजी
हत्तीरोगाचा प्रसार करणारे क्यूलेक्स डास घाण पाण्याची गटारे, खड्डे, नाल्यांत तयार होतात. हत्तीरोगाचे प्राबल्य कमी करण्याकरिता शौचालयाच्या व्हेंट पाइपला जाळ्या बांधाव्यात, डासोत्पत्ती स्थानांत डासअळी भक्षक गप्पी मासे टाकावेत. झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा, अंगभर कपडे घालून अथवा पांघरूण घेऊन डासांच्या चाव्यापासून स्वत:चे रक्षण करावे, उघड्या त्वचेवर डास प्रतिरोधक लावावे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अनिल कुकडपवार यांनी दिली.