चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद निवडणूक; घडामोडींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 15:28 IST2018-05-16T15:28:09+5:302018-05-16T15:28:20+5:30
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदार संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, त्यानुसार राजकीय हालचाली वेगाने होत आहेत.

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद निवडणूक; घडामोडींना वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषद मतदार संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, त्यानुसार राजकीय हालचाली वेगाने होत आहेत. अशातच मतदारांची पळवापळवी होण्याची भीती लक्षात घेऊन भाजपने नगरससेवक, जि.प. सदस्यांना अज्ञातस्थळी सहलीला नेले आहे. मात्र हे अज्ञात स्थळ लपून राहिले नसून महाबळेश्वर असल्याचे समजते.
या मतदार संघात रामदास आंबटकर(भाजप), इंद्रकुमार सराफ(काँग्रेस), सौरभ तिमांडे (अपक्ष) व जगदीश टावरी (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहे. मात्र जगदीश टावरी यांनी भाजप उमेदवाराला पाठींबा दर्शविल्यामुळे उर्वरित तीन उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. अपक्ष उमेदवार सौरभ तिमांडे यांचे वडील माजी आमदार राजू तिमांडे हे काँग्रेस उमेदवार हे भाजपशी साठगाठ करून असल्याचा आरोप करीत सुटले आहे. तर राजू तिमांडे यांनी भाजपच्या प्रलोभनावर ही उमेदवारी कायम ठेवून आघाडीला छेद दिल्याचा सूर काँग्रेस गोटातून उमटत आहे. यावरून काँग्रेस आणि अपक्षातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे.
भाजपकडे नगरसेवक, जि.प. सदस्य, पंचायत समिती सभापतींचा आकडा मोठा आहे. मात्र भाजपचे केंद्र आणि राज्यात सरकार असतानाही नगरसेवकांमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता भाजपची चिंता वाढवत असल्याचे बोलले जात आहे. अशात गफलत होण्याची भीती लक्षात घेऊन भाजपने आपले नगरसेवक, जि.प.सदस्य व पंचायत समिती सभापतींना अज्ञातस्थळी हलविले आहेत. मात्र हे अज्ञातस्थळ लपून राहिले नाही. या सर्वांना महाबळेश्वरला रवाना केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होतो. मात्र या निवडणुकीत असे काहीही होणार नसल्याच्या चर्चेनेही मतदार अस्वस्थ झाले असल्याचे समजते. एकंदर घडामोडींवरून विद्यमान स्थितीत भाजपची बाजू मजबूत मानली जात असली तरी मतदारांमध्ये असलेली अस्वस्थता कुणाच्या पथ्यावर पडते हे बघण्यासारखे आहे.