साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन तसेच वयोवृद्धांना केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. यासाठी ज्येष्ठांना दरवर्षी जीवनप्रमाणपत्र (हयातीचा दाखला) द्यावा लागतो. थकत्या काळामध्ये ही कामे करणे करणे अवघड होते. त्यामुळे ज्येष्ठांसाठी आता पोस्ट कार्यालय धावून आले असून, पोस्टमन ज्येष्ठांना घरोघरी जाणून जीवनप्रमाणपत्र देणार आहे. एवढेच नाही तर बँक तसेच शासकीय कार्यालयात प्रमाणपत्र पोहोचविण्याचे कामही पोस्टच करणार आहे. त्यामुळे ज्येष्ठांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे.दरवर्षी पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करावा लागतो. मात्र वाढत्या वयानुसार बँक, शासकीय कार्यालयात जाऊन दाखल देणे अवघड होते. अशावेळी अनेक ज्येष्ठांना आपल्या हक्काच्या पेन्शनपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे आता पोस्ट कार्यालयाने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट योजना सुरू केली आहे. यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील पोस्टमन ज्येष्ठांकडे जाऊन ही सेवा देत आहे. पोस्टमन संबंधित ज्येष्ठांकडे जाऊन आधारकार्ड, पॅनकार्ड, संबंधितांचे अंगठे (थम्ब इम्प्रेशन) घेऊन ऑनलाईन कागदपत्र संबंधित विभागाकडे पाठवीत आहे. यामुळे जाण्यायेण्यासाठी लागणारे पैसे तसेच त्रास वाचत असल्याने ज्येष्ठांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
७० रुपये येणार खर्च
- पोस्ट कार्यालयाद्वारे सुरू केलेल्या या सेवेसाठी ज्येष्ठांना जीवन प्रमाणपत्रासाठी ७० रुपये द्यावे लागणार आहे. - यामध्ये ज्येष्ठांना येण्या-जाण्याचा तसेच रांगेत लागण्याचा त्रास वाचणार आहे.