उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदाचे ग्रहण
By Admin | Updated: May 23, 2016 00:58 IST2016-05-23T00:58:47+5:302016-05-23T00:58:47+5:30
ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाल्यानंतर आजतागत उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची पदे पूर्णपणे भरण्यात आली नाही.

उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदाचे ग्रहण
रुग्णांचे हाल: कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला
वरोरा : ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाल्यानंतर आजतागत उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची पदे पूर्णपणे भरण्यात आली नाही. त्यामुळे आजही वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहेस तर नागरिकांनाही वैद्यकीय सेवा घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयाला वरोरा शहर, माढेळी, नागरी, कोसरसार, सावरी हे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वरोरा, माजरी, व शेगाव पोलीस ठाणे जोडण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या सत्रात तपासणीसाठी बाह्यरुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. वरोरा शहरालगत राज्य मार्ग, लोहमार्ग असल्याने अपघाताची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच पोलीस प्रशासनाने आणलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन, आरोपीची वैद्यकीय तपासणी शेगाव, माजरी व वरोरा पोलीस करीत असतात. उपजिल्हा रुग्णालयातील अनेक उपकरणे तंत्रज्ञाअभावी बंद असल्याचे समजते. उपजिल्हा रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकारी, दोन लिपीक व दोन चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे मागील काही महिन्यांपासून रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत असल्याने त्यांच्यावरील कामाचा ताण वाढल्याने कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी त्रस्त झाले आहेत. त्याचा विपरित परिणाम रुग्णांवर होत असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
रेफर टू सुरूच
वैद्यकीय अधिकारी व तंत्रज्ञानाची रिक्तपदे तर काही उपकरणे बंद असल्याने रुग्णांना आवश्यक सेवा उपजिल्हा रुग्णालयात मिळत नाही. त्यामुळे अपघात झाल्यानंतर आलेल्या जखमीवर मलमपट्टी केली की त्याला रेफर करण्याचा प्रघात मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. आजही तो कायम असल्याचे दिसून येत आहे.
वरोरा रुग्णालयाचे दोन अधिकारी प्रतिनियुक्तीवर
मागील कित्येक वर्षापासून उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पूर्ण पदे कधी भरण्यात आली नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा दिसत असताना उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर पाठवून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्तपदाचे ग्रहण चालू ठेवले आहे.
ओपीडी सकाळी १० वाजता
उपजिल्हा रुग्णालयात दररोज ३०० च्या आसपास बाह्यरुग्ण येतात. बाह्यरुग्ण तपासणी बहुतांश सकाळी १० वाजता नंतरच सुरू होत असल्याचे समजते. सकाळी ८ऐ वाजता बाहेरगावावरुन रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णाना ताटकळत रहावे लागत असल्याचे दिसून येत आहे.