बिबट्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गडबोरी गाव राहते रात्रभर जागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 20:54 IST2019-06-08T20:49:34+5:302019-06-08T20:54:18+5:30
सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी हे गाव मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या प्रचंड दहशतीत आहे. गावासभोवताल चार ते पाच बिबट फिरत असून आतापर्यंत बिबट्याने घरात घुसून दोघांचा बळी घेतला आहे.

बिबट्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गडबोरी गाव राहते रात्रभर जागे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी हे गाव मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या प्रचंड दहशतीत आहे. गावासभोवताल चार ते पाच बिबट फिरत असून आतापर्यंत बिबट्याने घरात घुसून दोघांचा बळी घेतला आहे. वनविभागाची चमू गावात ठाण मांडून आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी चार पिंजरे लावण्यात आले आहे. मात्र बिबट पिंजऱ्यांना हुलकावणी देत आहे. गावाभोवताल ५० सौर उर्जेचे दिवे लावण्याचे काम सुरू असून आतापर्यंत ३५ खांब लावून झाले आहे.
६ जूनच्या रात्री एका महिलेला बिबट्याने ठार केल्यानंतर वनविभागाने रात्री गस्तीत वाढ करून गावातील ५० युवकांनाही वनविभागाने गस्तीवर लावले आहे. गावाशेजारी वन विभागाने कॅमेरे लावले असून चार पिंजरे लावले आहेत. त्यातील दोन पिंजऱ्यावरून उडी मारून बिबट गेला. मात्र पिंजऱ्यात अडकला नाही. त्याच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.
गावाशेजारी वनविभागाने सौर उर्जेवर चालणारे दिवे लावण्याचे कार्य सुरू केले आहेत. त्यामुळे गावाशेजारी प्रकाश राहणार व स्पष्ट बिबट दिसल्यास मदत होईल. नागरिकांना त्रास होणार नाही. सौर दिव्यांसाठी ३५ खांब लावले असून उर्वरित १५ खांब लावण्याचे काम सुरू आहे.
रात्री ऐकू येते बिबट्यांची डरकाळी
गडबोरी गावासभोवताल चार ते पाच बिबट फिरत आहे. यातील एक बिबट वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केला आहे. उर्वरित बिबट गावपरिसरातील किल्ल्यावरच आहे. गावातील लोकांना रात्री बिबट्याची डरकाळी ऐकू येते. कधीकधी तर ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शनही होत आहे. त्यामुळे संपूर्ण गाव बिबट्याच्या दहशतीत जगत आहे.
गडबोरीमध्ये गस्त वाढवली असून गावातील ५० युवक गस्तीवर आहे व वनविभागाचे कर्मचारी रात्री गस्त घालत आहेत. गावासभोवताल सौरऊर्जाचे दिवे लावण्याचे काम सुरू आहे. रात्री दोन पिंजऱ्याला बिबट्याने हुलकावणी दिली. पण बिबट पिंजऱ्यात अडकला नाही. पिंजऱ्यात बिबटला अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
- एस.वाय. बुल्ले
क्षेत्र सहाय्यक नवरगाव
सिंदेवाही वनपरिक्षेत्र