तलाठ्याच्या गैरहजेरीने कोठारीतील शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: September 8, 2014 01:11 IST2014-09-08T01:11:32+5:302014-09-08T01:11:32+5:30
मागील चार महिन्यांपासून कोठारी येथील तलाठी कार्यालयात सतत अनुपस्थित राहात असल्याने कोठारीतील शेतकरी ...

तलाठ्याच्या गैरहजेरीने कोठारीतील शेतकरी त्रस्त
कोठारी : मागील चार महिन्यांपासून कोठारी येथील तलाठी कार्यालयात सतत अनुपस्थित राहात असल्याने कोठारीतील शेतकरी व सामान्य नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
१२ हजार लोकसंख्या असलेल्या कोठारी गावात चार महिन्यांपासून तलाठी गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांना सातबारा, उत्पन्नाचे दाखले, नमुना आठ-अ आदि दाखल्यांसाठी तसेच शेती कामासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी शेतकऱ्यांना कार्यालयासमोर सतत तलाठ्याची वाट पाहत राहावे लागत आहे. पटवाऱ्याची चातकाप्रमाणे वाट पाहूनही तो न आल्याने भ्रमनिरास होवून शेतकऱ्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.
कोठारीचे तलाठी नवले यांची बढती होवून बदली झाली. त्यांचा कार्यभार कळमनाचे पटवारी विनोद गणफाडे यांच्याकडे देण्यात आला. तेव्हापासूनच शेतकऱ्यांना विविध कामासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोठारीत नियमित तलाठी देण्याची कार्यवाही महसूल विभागाने अद्यापही केली नाही. सदर तलाठ्याकडे कळमनाचा मुख्य कारभार असून कोठारी साजाचा प्रभार आहे. कळमना येथे भरपूर काम असल्याने कोठारीत नियमित वेळ देणे शक्य होत नसल्याचे संबधित विभागाकडून सांगण्यात येते.
कोठारीत पटवारी नियमित देण्यात यावी व शेतकरी व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी. यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी त्वरीत कार्यवाही करून स्थायी तलाठी देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा कोठारी येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष किशोर कोटरंगे यांनी दिला आहे.
आपल्याकडे कळमना साजाचा कार्यभार असून त्यात भरपूर काम आहे. कोठारीचा प्रभारी कारभार असून नियमीत वेळ देता येत नाही. मात्र नागरिकांचे व शेतकऱ्यांची कामे थांबणार नसल्याची दक्षता घेण्यात येत असल्याची प्रतिक्रिया विनोद गणफाडे यांनी दिली. (वार्ताहर)