'बुलेट ट्रेन नको, आम्हाला शाळा हवी'; फलक लावून गावक-यांकडून शासनाचा निषेध, कुलूप तोडून शिक्षकांविना भरविली शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 16:29 IST2017-12-30T16:28:51+5:302017-12-30T16:29:04+5:30

कोरपना तालुक्यातील क्रमांक एकची प्रगत, आयएसओ जिल्हा परिषद शाळा गेडामगुडा पटसंख्येअभावी बंद झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

'Do not want bullet train, we want school' | 'बुलेट ट्रेन नको, आम्हाला शाळा हवी'; फलक लावून गावक-यांकडून शासनाचा निषेध, कुलूप तोडून शिक्षकांविना भरविली शाळा

'बुलेट ट्रेन नको, आम्हाला शाळा हवी'; फलक लावून गावक-यांकडून शासनाचा निषेध, कुलूप तोडून शिक्षकांविना भरविली शाळा

कोरपना(चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील क्रमांक एकची प्रगत, आयएसओ जिल्हा परिषद शाळा गेडामगुडा पटसंख्येअभावी बंद झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. 'बुलेट ट्रेन नको आम्हाला शाळा हवी' या आशयाचे फलक लावून गावकऱ्यांनी शासनाचा निषेध केला आहे.

कोरपना तालुक्यातील पाच जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या असून त्यापैकी जिल्हा परिषद शाळा, गेडामगुडा ही एक शाळा आहे. बिबी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या या शाळेच्या प्रगतीसाठी गावकऱ्यांनी कठीण परिश्रम घेतले आहे. गावकऱ्यांचे हे परिश्रम आता इतिहासजमा झाले असून या शाळेतील विद्यार्थ्यांचे आसन (बु) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर केले आहे. मात्र येथील विद्यार्थी कोणत्याही शाळेत जाण्यास तयार नसून पालकही आपल्या पाल्यांना इतर शाळेत पाठविण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून शिक्षकांविना विद्यार्थ्यांची शाळा भरवली.

जिल्हा परिषद शाळा गेडामगुडा या शाळेने आमच्या विद्यार्थ्यांना घडविले आहे. शाळेच्या विकासात पालकांचे मोठे योगदान आहे. एका आदिवासी खेड्यातील आमचे आदिवासी विद्यार्थी शहरी भागातील शाळेतल्या विद्यार्थ्यांची बरोबरी करायला लागले आहे. त्यामुळे शासनाला बरे वाटत नसावे असा खोचक चिमटा गावकऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना काढला.

लोकसहभागातून शाळा घडली असल्यामुळे या शाळेच्या बाबतीत लोकांच्या भावना जुळलेल्या आहे. एवढेच नाही तर कोणत्याही बाबतीत शाळा मागे नाही. शाळेचा दर्जा उंचावलेला आहे. त्यामुळे गेडामगुडावासी शेतातील काम धंदे सोडून शाळा बंद असतानाही शाळेत बसून असतात. असे विदारक वास्तव सध्या तरी पाहायला मिळत आहे. शासन गेडामगुडावासियांच्या मागणीकडे कशाप्रकारे लक्ष देऊन ही समस्या सोडवते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद शाळा गेडामगुडा या शाळेला विशेष दर्जा देऊन ही शाळा सुरू करणे आवश्यक आहे. कारण ही शाळा गुणवत्ता प्रधान असून शासनाच्या निकषानुसार गुणवत्ता नसलेल्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. गुणवत्ता नसलेल्या शाळांमध्ये या शाळेचा समावेश होत नसल्यामुळे या उपक्रमशील शाळेला पूर्ववत सुरू करण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
उत्तमराव पेचे, माजी जिल्हा परिषद सदस्य

Web Title: 'Do not want bullet train, we want school'