डेंग्युसदृश आजाराने घाबरु नका
By Admin | Updated: October 1, 2014 23:20 IST2014-10-01T23:20:47+5:302014-10-01T23:20:47+5:30
जिल्ह्यातील काही भागात डेंग्युसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सरले आहे. मात्र नागरिकांनी डेंग्यूच्या आजाराने घाबरुन न जाता नजीकच्या रुग्णालयात

डेंग्युसदृश आजाराने घाबरु नका
आशुतोष सलील यांचे आवाहन : राजुरा येथे कार्यशाळेत मार्गदर्शन
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही भागात डेंग्युसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सरले आहे. मात्र नागरिकांनी डेंग्यूच्या आजाराने घाबरुन न जाता नजीकच्या रुग्णालयात जाऊन योग्य तो उपचार करुन घ्यावा. स्वच्छता हाच डेंग्यू आजारावर प्रतिबंधात्मक एकमेव उपाय आहे. डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले.
राजुरा पंचायत समितीत मंगळवारी पार पडलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. ज्या परिसरात डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून आलेले आहेत, त्या परिसरात आरोग्य विभाग व चंद्रपूर जिल्हा परिषदेच्यावतीने जनजागृती कार्यशाळा घेण्यात येत आहे. त्यानुसार राजुरा येथेही कार्यशाळा पार पडली.
तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, आरोग्य कर्मचारी यांच्या सहभागात डेंग्यू जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. दीपक सेलोकर, राजुरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी ज्ञानश्वर सपाटे, जिल्हा हिवताप अधिकारी नन्नावरे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. दीपक सेलोकर यांनी उपस्थिताना डेंग्यू आजाराबाबतची कारणे, लक्षणे व उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. डेंग्यू आजार कशामुळे होतो व त्याच्या प्रतिबंधासाठी काय उपाय करावे, याबाबत मार्गदर्शन केले. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून त्याचा प्रसार एडीस इजिप्टा डासाच्या मादीने चावा घेतल्याने होतो. या डासाची घनता शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आढळून आलेली आहे. एडीस डास घरात घराभोवतीच्या साठविलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतो. मुख्यत्वेकरुन पाणी साठविलेली उघडी भांडी, रांजन, ड्रम, घराभोवती इतर पडलेल्या निरुपयोगी वस्तू, खराब टायर्स, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक बाटल्या, बाटल्यांची टोपणे, चहाचे डिस्पोजेबल कप, डबे, पाण्याची कारंजी, फुलदाण्या, कुंड्या, जुन्या पद्धतीचे कुलर्स, फ्रिज, घराच्या छतावर टाकलेले प्लास्टिक, पक्षांना पाणी पिण्यासाठी ठेवलेली भांडी इत्यादी वस्तुंची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी व स्वच्छता बाळगावी, असे याप्रसंगी सांगण्यात आले.
डेंग्यू आजारात तीव्र ताप, डोकेदुखी, उलटी, तीव्र पोटदुखी, डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर रॅश, पुरळ अशी लक्षणे आढळून येतात व गंभीर आजाराचे रुग्ण असल्यास प्लेटलेट कमी होऊन रक्तस्त्रावामुळे आणि शॉकमुळे त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळे डेंग्यू आजाराचे पॉझेटीव्ह रुग्ण आढळून आल्यास, डेंग्यूवर कोणताही नेमका उपचार नसल्यामुळे ताप आल्यास योग्य उपचाराकरिता पॅरासिटामॉल द्यावे, भरपूर पाणी पिणे, विश्रांती घेणे व लक्षणानुसार उपचार करणे हेच महत्वाचे प्रथम योग्य उपचार आहेत. त्यामुळे डेंग्यू आजाराने घाबरुन न जाता संबंधित रुग्णांनी नजिकच्या दवाखान्यात जाऊन योग्य उपचार घ्यावे, असा सल्ला कार्यशाळेत देण्यात आला.
घराभोवती परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा, जुने टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक कप, वेस्टेज प्लास्टिक जाळून टाकावे, पाण्याची भांडी, ड्रम, रांजन व्यवस्थित झाकून ठेवावीत, शौचालयाच्या हेंट पाईपला जाळी बसविण्यात यावी, गावात आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, परिसरातील डबकी वाहती करावी, शक्यतो बुजवावी. डासापासून संरक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसविण्यात याव्या व झोपताना मच्छरदानीचा वापर करावा, अशाप्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)