परिश्रम करा, यश हमखास मिळेल
By Admin | Updated: February 29, 2016 00:34 IST2016-02-29T00:34:25+5:302016-02-29T00:34:25+5:30
कलावंतांनी परिश्रम केल्यास यश हमखास मिळते. कलावंतांनी आरसा आणि सावली याप्रमाणे सहकारी कलावंतांसह नाती जोपासावी.

परिश्रम करा, यश हमखास मिळेल
आशालता यांचे प्रतिपादन : नवोदिताचा कलासाधक सन्मान प्रदान सोहळा
चंद्रपूर : कलावंतांनी परिश्रम केल्यास यश हमखास मिळते. कलावंतांनी आरसा आणि सावली याप्रमाणे सहकारी कलावंतांसह नाती जोपासावी. कारण आरसा खरे तेच सांगतो आणि सावली कधीच साथ सोडत नाही. हा माझ्या गुरूंनी दिलेला सल्ला मला आयुष्यभर कामी आला, असे मनोगत ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनी व्यक्त केले.
मराठी राजभाषा दिवस तसेच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंती दिनानिमित्त नवोदिता चंद्रपूर या संस्थेतर्फे आयोजित कलासाधक सन्मान प्रदान सोहळ्यात त्या बोलत होत्या. हिंदी व मराठी चित्रसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या हस्ते डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांना कलासाधक सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर अर्थ व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सिने नाटय अभिनेते श्रीकांत देसाई, देवेंद्र गावंडे, नवोदिताचे अध्यक्ष शरद गुप्ता, सचिव प्रशांत कक्कड यांची उपस्थिती होती. सन्मानचिन्ह, साडी, श्रीफळ, मानपत्र देऊन आशालता वाबगावकर आणि ना. सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. जयश्री कापसे यांना कलासाधक सन्मान प्रदान केला.
यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरची यशोपताका चंद्रपूरकर कलावंतांनी मुंबईसह राज्याबाहेरही फडकावली आहे. ही अभिमानाची बाब आहे. जयश्री कापसे यांचा रंगप्रवास हौशी रंगभूमीवरील कलावंतांसाठी प्रेरणादायी आहे. येत्या काळात चंद्रपूरचे सांस्कृतिक वैभव अधिक संपन्न व्हावे, या दृष्टीने जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेन, असेही ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
नाट्यक्षेत्राच्या माध्यमातून कलेची सेवा करताना जे समाधान मिळतं, आनंद मिळतो तो केवळ अवर्णनीय असतो. माझ्या रंगप्रवासात अनेक चढ उतार मी अनुभवले. पण कुटुंबीयांच्या सहकार्याने सहकारी कलावंतांच्या प्रोत्साहनाने तसेच रसिक प्रेक्षकांच्या शुभेच्छांमुळेच मी आज इथे उभी आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत रंगसेवा करेन, असे प्रतिपादन डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
यावेळी देवेंद्र गावंडे, श्रीकांत देसाई यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक अजय धवने यांनी केले. मानपत्राचे वाचन आशिष अंबाडे यांनी केले. नवोदिताच्या ‘चिंधीबाजार’ या नाटकाचा यशोप्रवास उलगडणाऱ्या ‘मेकिंग आॅफ चिंधीबाजार’ या पुस्तकाचे विमोचन यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुशील सहारे, नूतन धवने, धनंजय धनगर, संजय पुरकर, सचिन घोडे या कलावंतांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
कलासाधक सन्मान प्रदान सोहळयानंतर डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांच्या रंगप्रवासावर दृष्टिक्षेप टाकणारा ‘अशी ही जयश्री’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात रोहिणी उईके, बबिता उईके, मेघा मेश्राम, गायत्री देशपांडे, अश्विनी खोबरागडे, धीरज भट, रितेश चौधरी, अंकुश दारव्हेकर, विनोद वाडेकर, सुरज रंगारी, विशाल ढोक, संजय पूरकर, जगदीश नंदूरकर, स्नेहीत पडगिलवार, मेघना शिंगरू, बकुळ धवने, अवनी शिंगरू, राजू आवळे आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन धनंजय धनगर यांनी केले.