जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:20+5:302021-04-25T04:28:20+5:30
राजुरा : मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर ही जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे ...

जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
राजुरा : मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर ही जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्री दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
शेकडो ग्राहक त्रस्त
सावली : तालुक्यातील बहुतांश गावात इंटरनेट सेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही बँकांमध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत राहावे लागते. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अशी मागणी आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
राजुरा : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पडोली परिसर प्रदूषणामुळे त्रस्त
पडोली : परिसरातील विविध उद्योगांमुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. हा परिसर एमआयडीच्या हद्दीत येतो. या ठिकाणी विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही दिवसांपूर्वी उद्योग व्यवस्थापनांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, प्रदूषण रोखण्यासाठी अद्याप उपाययोजना केल्या नाही.
ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती करावी
गोंडपिपरी : तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, खड्डे मात्र बुजलेच नसल्याचे चित्र आहे. परिणामी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कापूस उत्पादकांच्या समस्या सोडवा
वरोरा : तालुक्यात कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु, परतीचा पाऊस तसेच बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापही प्रशासनातर्फे हालचाली करण्यात येत नसल्यामुळे संतापाचे वातावरण बघायला मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने चौकशी करून कापूस उत्पादकांना मदत करण्याची मागणी केली जात आहे.
पाण्याची पातळी खालावली
राजुरा : तालुक्यातील गोवरी परिसरातील पाण्याची पातळी खालावल्याने नाले कोरडे पडले आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नदी, नाले कोरडे पडायला लागल्याने शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
ढिगाऱ्यांमुळे वन्यप्राण्यांचे वास्तव
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलीने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहे. या मातीच्या ढिगाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल निर्माण झाल्याने वन्यप्राण्यांचा याठिकाणी वावर वाढला आहे. त्यामुळे वेकोलीचे मातीचे ढिगारे धोकादायक ठरत आहेत.
जुन्या वाहनांना कालबाह्य करावे
घुग्घुस : शहरात कोळसा खाणी तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून, प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता
गडचांदूर : गडचांदूर रेल्वे क्राॅसिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र, गतिरोधक नसल्याने हा महामार्ग धोकादायक ठरत आहे. या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक (पेट्रोल पंप), संविधान चौक (बसस्थानक) व वीर बाबूराव शेडमाके चौक गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने जात आहेत. यामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रमुख मार्ग असल्याने नागिरकांना याच दिशेने जावे लागते. त्यामुळे पोलीस व बांधकाम विभागाने समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या तसेच वाहनांची संख्या वाढली आहे.
दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी
कोरपना : येथील बीएसएनएलच्या दूरभाषा केंद्राची दुरवस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून, अधिकारी व कर्मचारीही नाही. त्यामुळे नागरिकांना राजुरा येथे जाऊन आपली कामे करावी लागत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
संपादित जमिनीचा मोबदला द्यावा
सिंदेवाही : नवरगाव परिसरातून गोसेखुर्दचा उजवा कालवा आलेला आहे. यासाठी शेतजमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, काही शेतमालकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
कोंडवाड्यांतील जनावरे असुरक्षित
कोरपना : मोकाट जनावरांना ठेवण्यासाठी गावागावांत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, सद्य:स्थितीत या कोंडवाड्यांची अवस्था बिकट आहे. जिल्हा परिषदेने यासाठी निधी देण्याची मागणी केली जात आहे.