मुहूर्त सापडेना : दोन वर्षांपासून इमारत बनली शोभेची वास्तूलोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव: लाखो रूपये खर्चून कोरपना या तालुकास्तरावर दिवाणी व फौजदारी न्यायालयासाठी इमारत बांधण्यात आली. परंतु, इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षे लोटली तरी, या न्यायालयाच्या उद्घाटनासाठी अद्यापही मुहूर्त गवसला नाही. या कारणाने ही इमारत अडगळीत पडून दुरवस्थेस कारणीभूत ठरत आहे.कोरपना तालुका हा भौगोलिक व लोकसंख्येचा दृष्टीकोनातून मोठा आहे. या तालुक्यातील जनतेला न्यायालयीन कामकाजाकरिता येथून ४२ किलोमीटर अंतरावर असलेल्या राजूरा येथे जावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावांपासून राजूराचे अंतर १०० किलोमीटरच्या आसपास असल्याने गैरसोयीचे ठरत आहे. राजुरा न्यायालयातंर्गत राजुरा, कोरपना, जिवती हे तालुके येतात. त्यामुळे येथील कामकाजाचा ताणही मोठा आहे. या कारणांने कोरपनाचे न्यायालय त्वरीत होणे अंत्यत गरजेचे आहे. सद्य:स्थितीत या न्यायालयाच्या उद्घाटनाला होणाऱ्या विलंबामुळे येथील इमारतीच्या खिडक्या, दरवाज्यांची नासधूस होत आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा केलेला खर्च व्यर्थ जात आहे. याबाबत अनेकदा लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या उद्घाटनाला मुहूर्त केव्हा मिळणार, असा प्रश्न पडला आहे.
कोरपना न्यायालय न्यायाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2017 00:30 IST