खासगी जागेत ओट्यांचे बांधकाम
By Admin | Updated: February 27, 2016 01:28 IST2016-02-27T01:28:31+5:302016-02-27T01:28:31+5:30
संसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पांतर्गत आठवडी बाजार विकास योजनेचे काम मंजूर झाले.

खासगी जागेत ओट्यांचे बांधकाम
चंदनखेडा येथील प्रकार : मोजणीनंतर जागा मालकाने रोवले खांब
चंदनखेडा : संसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पांतर्गत आठवडी बाजार विकास योजनेचे काम मंजूर झाले. सदर काम आदर्शपणे व्हावे यासाठी नियुक्त बाजार समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, काही आदिवासी समाज बांधव तसेच लगतच्या शेतजमीन मालकांनी जागा मोजणी करुन बाजाराचे ओटे बांधण्यासाठी ठराव घेतला. त्यानंतर ग्रामपंचायतीला अर्ज सादर केला. मुजोरीने सुरू असलेले काम बंद करण्याचा प्रयत्न केला असता, सरपंच गायत्री बागेसर यांच्या आशीर्वादाने कंत्राटदाराने काम सुरूच ठेवले. याच दरम्यान लगतच्या शेतजमीन मालकांनी केलेल्या शासकीय मोजणीत बाजाराचे बांधलेले काही ओटे हे त्यांच्या हद्दीत बांधण्यात येत असल्याचे उजेडात आले आहे.
यामुळे संबंधित व्यक्तीचे धाबे दणाणले असून केलेली मुजोरी अंगलट आल्याने आता सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न कंत्राटदाराला सोबत घेऊन काही संबंधित हितचिंतक करताना दिसत आहे.
सरपंच तसेच त्यांच्या नातलगांचे बाजाराचे जागेवर अतिक्रमण असल्याने त्याची झळ आपणास बसू नये तसेच आर्थिक हित जोपासण्यासाठी अनेक क्लुप्त्या वापरुन मोजणी न करता काम सुरू केले होते. परंतु काही त्रुट्यामुळे बाजार विकास समिती तथा नागरिकांनी काम बंद पाडून योग्य पद्धतीने काम व्हावे अशी सूचना केली असता सरपंनाच्या आशिर्वादाने कंत्राटदाराने मुजोरीने काम सुरूच ठेवले. या जागेलगतच दक्षिणेस भू.मा.क्र. ३९/१ क्षेत्र ०.२६ आर ही जमीन किसन रामाजी धकाते यांच्या वारसदाराची नावे असून मागील क प्रत नुसार त्यांच्या जमिनीचा काही भाग बाजार जागेत येत असल्याने त्यांनी सरकारी मोजणी होईपर्यंत बांधकाम थांबवावे, असे निवेदन १० फेब्रुवारी रोजी ग्राम पंचायतीला दिले असतानाही बांधकाम सुरू ठेवले होते. त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाद्वारा २१ फेब्रुवारीला उउपसरपंच व सरपंचाचे पती व इतरासमक्ष मोजणी झाली असता धकाते यांच्या जागेवर बाजाराचे काही ओटे बांधकाम आलेत. त्यामुळे २२ फेब्रुवारीला धकाते यांनी मोजणीनंतर निश्चित झालेल्या जागेवर सिमेंट पोल गाडून आपली हद्द निर्धारित करीत असताना सरपंचांनी अटकाव गेला व पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची त्यांना धमकीही दिली. त्यानंतर धकाते यांनी केलेल्या अतिक्रमणा संदर्भात जागा मोकळी करून देण्याबाबत ग्राम पंचायतीला निवेदन दिले.(वार्ताहर)