लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : सध्या देशात मतचोरी आणि मतदार यादीच्या गौडबंगालाविषयी मोठी चर्चा सुरू आहे. मात्र नागभीड तालुक्यात मतदार यादीचा वेगळाच घोळ समोर आला आहे. एका गावातील मतदारांची नावे दुसऱ्या गावात आणि परत त्या दुसऱ्या गावातील मतदारांची नावे तिसऱ्याच गावच्या यादीत टाकण्यात आल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.
मुद्राराक्षसाच्या दोषांमुळे नाव, आडनावात चुका होण्याची अनेक उदाहरणे आतापर्यंत ऐकिवात होती. परंतु एका गावातील बूथवर दुसऱ्या गावातील मतदारांची नावे टाकून परत त्याच गावातील बूथवर तिसऱ्या गावातील मतदारांची नावे टाकण्यात आली. ही बाब 'लोकमत'ने मागील लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या पूर्वसंध्येस उघडकीस आणली होती. ही चूक सरकारी बाबूंकडून झाली असली तरी झालेल्या या प्रकारास कंटाळून अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नव्हता.
आता मधल्या एका वर्षाच्या काळात प्रशासनाने या चुका दुरुस्त केल्या की, तशाच आहेत, याबाबत मतदार संभ्रमात आहे. यासंदर्भात तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्याशी संपर्क साधला मात्र संपर्क झाला नाही.
या गावांमध्ये झाला होता सावळागोंधळ
- देवपायली आणि सोनुली या दोन गावांची गट ग्रामपंचायत आहे. दोन गावांतील अंतर दीड किमी आहे. सोनुलीच्या मतदारांची नावे देवपायलीच्या बूथवर टाकण्यात कोणतीही हरकत नव्हती. मात्र सोनुलीच्या मतदारांची नावे ४ किमी अंतरावर असलेल्या राजुली येथील बूथवर तर राजुली येथील मतदारांची नावे बोंड येथील बूथवर टाकण्यात आली होती.
- समाविष्ट आहेत. यातील पारडी बोंड गट ग्रामपंचायतीत ४ गावे गायमुख येथील मतदारांची नावे देवपायलीच्या बूथवर टाकण्यात आली आहेत. वास्तविक पारडी गायमुख गावास बोंड गाव अतिशय जवळ. मात्र पारडी येथील नावे तीन किमी अंतरावरील देवपायलीच्या बूथवर टाकण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
- वासाळा मेंढा या ग्रामपंचायतीत वासाळा मक्ता हे गाव अंतर्भूत आहे. वासाळा मक्ता येथील नावे तेथेच हवी होती. मात्र येथील नावे ४ किमी अंतरावरील किटाळी मेंढा येथे समाविष्ट करण्यात होती. असेच प्रकार राजुली, नवानगर, पारडी ठवरे या गावासह आणखी अनेक गावांत घडले होते.