कविसंमेलनाने झाला साहित्य संमेलनाचा समारोप
By Admin | Updated: February 16, 2015 01:13 IST2015-02-16T01:13:13+5:302015-02-16T01:13:13+5:30
मराठी भाषा मरणासन्न झाली नाही. तिची वैचारिक बांधीलकी मोठी व व्यापक आहे. तिचा विस्तार करण्याची गरज आहे.

कविसंमेलनाने झाला साहित्य संमेलनाचा समारोप
बल्लारपूर : मराठी भाषा मरणासन्न झाली नाही. तिची वैचारिक बांधीलकी मोठी व व्यापक आहे. तिचा विस्तार करण्याची गरज आहे. साहित्यकांनी भाषेला केंद्रस्थानी माणून नवोदितांना प्रेरणा देण्यासाठी मराठी भाषेचा अभिमान बाळगणारी करा, असा सल्ला चंद्रपूर जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. राजन जयस्वाल यांनी दिला.
चंद्रपूर येथील सूर्यांश साहित्य व संस्कृती मंचच्या वतीने जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. रविवारी समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. दरम्यान ना.गो. थुटे यांच्या अध्यक्षतेखाली समारोपीय कवी संमेलन घेण्यात आले.
याप्रसंगी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, लेखक श्रीपाद जोशी, जिल्हा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व महानगरपालिका सदस्य संजय वैद्य यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. राजन जयस्वाल यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. जयस्वाल म्हणाले, साहित्यिकांचे क्षेत्र विस्तारले आहे. प्रवाहित झाले आहे. एखादी कथा आवडणार नाही. पण व्यंग चित्र बोलकी वाटतात. तोही साहित्याचा प्रकार आहे. विविध क्षेत्रात व्यासंग जोपासणारे एक प्रकारे साहित्यिकच आहेत. त्यांचे योगदानही या क्षेत्राला मिळत आहे. मनातील खदखद व्यक्त करणारे लेखक चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा साहित्य संमेलन पर्वणी ठरले आहे. चंद्रपूर जिल्ह्याने साहित्य संमेलनाचे मंगलमय तोरण बांधले आहे. वाङमयीन क्षेत्राचे यातून सिंहावलोकन करून वाटचाल सुरू केली. आता थांबायचे नाही. पुढे वाटचाल करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा स्तरावरचे साहित्य संमेलन असले तरी दोन दिवसात उर्जा मिळाली. उगवणाऱ्या अंकुराला फुलण्याची संधी मिळाली. परिसंवादातून विचारमंथन घडले. प्रबोधनाचे कार्य झाले. कविंचा रोख कवित्वापेक्षा मोठा दिसला.
भाषेसाठी जगण्याची प्रेरणा साहित्य संमेलनाने दिल्याचा आशावादही डॉ. जयस्वाल यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शांताराम पोटदुखे यांनी जेष्ठ साहित्यिक राम शेवाळकर यांच्या चंद्रपूर शहरातील साहित्य योगदानाबद्दल आठवण करून ते आज आपल्यात नसल्याबाबत खंत व्यक्त केली.
समारोपीय कार्यक्रमादरम्यान कवि संमेलनाच्या माध्यमातून किशोर कवठे, अविनाश पोईनकर, डॉ. विजय सोरते, चित्रलेखा धंदरे, नरेश बोरीकर, बंशी कोठेकर, संगीता धोटे, बापुराव टोंगे, पदमरेखा वानखेडे, खुशालदास कामडी यांच्यासह अन्य कविनीं आपआपल्या लेखनीतून साकारलेल्या दर्जेदार व मार्मिक कविता सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील साहित्यिक, विद्यार्थी उपस्तित होते. (शहर प्रतिनिधी)