उद्योग सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST2021-07-19T04:19:02+5:302021-07-19T04:19:02+5:30
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उद्योगांचा आढावा चंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला. या काळात अनेकांचे ...

उद्योग सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उद्योगांचा आढावा
चंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गाचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला. या काळात अनेकांचे रोजगार गेलेच, पण अर्थव्यवस्थेची गतीसुध्दा मंदावली. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी राज्य शासनाने आता कोरोनाच्या काळातसुध्दा उद्योग सुरू राहील, याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही जिल्ह्यातील उद्योग सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली 'उद्योग टास्क फोर्स'ची स्थापना करण्यात आली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्योगांवर होणारा विपरीत परिणाम टाळणे, यादरम्यान उद्योग सुरू राहावेत, तसेच उद्योगांच्या ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, एमआयडीसी औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांच्यासह उद्योग संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उद्योग सुरळीत सुरू राहण्यासाठी उद्योगांनी आपापल्या कार्यक्षेत्रातच कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करावी. जे कर्मचारी बाहेर राहात असतील, त्यांच्यासाठी उद्योगाने ने - आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी. ज्या उद्योगांकडे वाहने नसतील, त्यांनी परिवहन मंडळाकडून बसेस घ्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला डब्ल्यूसीएलचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक, माणिकगड तसेच एसीसी सिमेंटचे प्रतिनिधी यांच्यासह इतरही उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बाॅक्स
नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करा
सर्व उद्योगांनी विलगीकरण कक्ष, तपासणी कक्ष, लसीकरण केंद्र स्वत: उभारावेत, उद्योगांमध्ये कोरोना वर्तणूकविषयक बाबींचे काटेकोरपणे पालन करावे, नियमित मास्कचा वापर, सामाजिक अंतर, वारंवार हात स्वच्छ धुणे आदींचा समावेश आहे. यासाठी कंपन्यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.