देवाडा (खु.) : हिवताप व हत्तीपायासह इतर रोगांचा प्रसार थांबविण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने मोहिम राबविली जात असली तरी या रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या डासांचा नायनाट प्रथम करणे गरजेचे असताना आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन उदासीन आहे. परिणामी पोंभूर्णा तालुका परिसरातील अनेक भागात डासांचा प्रकोप वाढला आहे पोंभूर्णा येथील वार्ड क्रमांक चारमध्ये संसर्गजन्य आजाराच्या साथीला सुरुवात झाली आहे. एकीकडे महाराष्ट्र शासन नागरिकांचे आरोग्य व स्वच्छतेविषयी मोहिम राबवित आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्षात पोंभूर्णा शहरात व ग्रामीण भागात मात्र विरोधाभास निर्माण करणारे चित्र पहायला मिळत आहे. स्वच्छतेचा कुठे मागमुसही दिसत नाही. शहरात डासांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे विविध संसर्गजन्य आजाराची साथ सुरू झाली आहे. बालकांसह वृद्ध व युवकांना साथीच्या विविध आजारांनी ग्रासले आहे. ताप, खोकला, सर्दी पडसे यासारख्या सामान्य आजारासोबत इतरही आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे येथील खासगी दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील शासकीय रुग्णालयात पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना होत नसल्याने काही रुग्ण चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत. पोंभूर्णा येथील वार्ड क्रमांक चारमधील पाच रुग्ण डेंग्यूसदृश्य तापाच्या विळख्यात असून ते खासगी रुग्णालयात भरती असल्याचे सांंगण्यात येत आहे.तालुक्यातील कसरगट्टा येथे नुकतीच विषाणूजन्य आजाराची साथ सुरू झाली होती. ती सध्या काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तालुक्यातील पोंभूर्णा, बोर्डा बोरकर, झुल्लुरवार, चिंतलधाबा, देवाडा (खुर्द) या ठिकाणी मार्च, एप्रिल महिन्यामध्ये डेंग्युसदृश्य तापाने कहर केला होता. त्यातच तिघांचा मृत्युसुद्धा झाला होता. त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नाल्यांचा थातुर- मातूर उपसा करुन फॉगिंग मशीनद्वारे काही गावांमध्ये एकदा फवारणी करण्यात येवून आपली जबाबदारी झटकली होती. त्यावेळी फक्त मुख्य रस्त्यांच्या नाल्याचा उपसा करण्यात आला होता. त्यातही काही दुकानदारांनी नाल्यावर अतिक्रमण केल्याने त्याठिकाणची जागा उपसा न झाल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याची विल्हेवाट होवू शकली नाही. परिणामी जिकडे-तिकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी डासांनी आपला उच्छाद मांडला असून नानाविध आजाराला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. शहरात व ग्रामीण भागात विविध संसर्गजन्य आजाराची साथ पसरत आहे. आजारानी उग्ररुप धारण करण्यापूर्वीच स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने नाल्यांमधील घाणीची विल्हेवाट लावावी व डासांचा नायनाट करण्यासाठी तालुक्यात फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करावी अशी मागणी होत आहे. सायंकाळी होणाऱ्या सततच्या विजेच्या लंपडावामुळे डासांचा उपद्रव अधिक होत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. (वार्ताहर)
डासांनी उडविली नागरिकांची झोप
By admin | Updated: September 6, 2014 23:40 IST