चार्लीत डेंग्युसदृश तापाची साथ सुरूच
By Admin | Updated: September 9, 2014 00:16 IST2014-09-09T00:16:44+5:302014-09-09T00:16:44+5:30
राजुरा तालुक्यातील चार्ली येथे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या डेंग्युसदृश तापाच्या साथीचा प्रकोप वाढतच असून सोमवारी पुन्हा एका युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

चार्लीत डेंग्युसदृश तापाची साथ सुरूच
सास्ती : राजुरा तालुक्यातील चार्ली येथे मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या डेंग्युसदृश तापाच्या साथीचा प्रकोप वाढतच असून सोमवारी पुन्हा एका युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या आजाराने अजुनही शेकडो रुग्ण बाधित असून त्यांच्यावर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असूनही आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
राजुरा तालुक्यातील नदीपट्टा भागातील गावात तापाची साथ सुरू आहे. त्यात चार्ली येथे मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू असून गावातील प्रत्येक घरात एक रुग्ण आढळून येत आहे. परंतु मोठ्या प्रमाणात साथ सुरू असतानाही आरोग्य विभागा याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तीन दिवसांपूर्वीच येथील माया दत्तु बोढे (३०) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, तर सोमवारी येथील मारोती चिंधूजी आत्राम (३६) या युवकाचा मृत्यू झाला. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गावात शेकडो रुग्ण बाधित असून अनेक रुग्ण राजुरा, बल्लारपूर व चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात संजय गौरकार यांचा मुलगा, यादव वडस्कर, आशिष बोढे यांची भाची, विजय निवलकर यांचा मुलगा व मुलगी विनोद खवसे, गंगाधर कुचनकर यांची मुलगी, कवडू खवसे यांची मुलगी, किशोर घाटेयांचा मुलगा, शंकर वडस्कर यांचे वडील इंद्रजीत झुंगरे यांची पत्नी, जयराम दरेकार यांचा मुलगा, किसन टोंगे यांची पत्नी, सतिश मुसळे यांची मुलगी ढुमने परिवारातील काही सदस्यांचा समावेश आहे.
गावात सुरू असलेल्या तापाच्या साथीमुळे नागरिक हैराण झाले असून गावात मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्यामुळे याठिकाणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर लावून वैद्यकीय सेवा त्वरीत पुरविण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)