Chandrapurkar will have to wait for six months for 'Amrut' | चंद्रपूरकरांना सहा महिने पहावी लागेल ‘अमृत’ची वाट

चंद्रपूरकरांना सहा महिने पहावी लागेल ‘अमृत’ची वाट

ठळक मुद्देपायाभूत कामे शिल्लक : चंद्रपूर मनपा क्षेत्रातील १६ पैकी दोन झोनमध्येच सुरू झाली नळ योजना

राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्र्रपूर : शहरातील साडेतीन लाख लोकसंख्येला पिण्याचे पाणी मिळावे, याकरिता केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अ‍ॅण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन म्हणजे अमृत या नळ योजनेवर आतापर्यंत १९२ कोटी २० लाखांचा निधी खर्च झाला. तुकूम व विठ्ठल मंदिर झोनमध्ये प्रायोगिकस्तरावर नळयोजना सुरू झाली. मात्र, उर्वरित १४ झोनमधील लाखो नागरिकांना ‘अमृत’ साठी पुन्हा किमान सहा महिन्यांहून जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे ‘लोकमत’ च्या पाहणीतून पुढे आले.
चंद्रपूर शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. सद्यस्थितीत ८२ हजारांहून जास्त घरे असून जुन्या पाणी पुरवठा योजनेतून केवळ ३५ हजार अधिकृत नळधारक पिण्याच्या पाण्याची गरज भागवतात. इतर नागरिकांना अन्य स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागते. जुन्या नळयोजनेतून संपूर्ण शहराला मुबलक पाणी पुरवठा होऊ शकत नाही. 

जलशुद्धीकरण केंद्राचे काम ७३ टक्के
तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या सुधारणेचे ७३ टक्के काम पूर्ण झाले. परंतु, क्लरिफाय, प्लॅश मिक्सर, फिल्टर रूम, अ‍ॅलम सोल्युशन टँक, ब्लोअर, फिल्टर बेडमधील पॅनल तसेच १७० अश्वशक्तीचे तीन पंप बदलविण्याची कामे पूर्ण झाली आहेत. खोदकाम, रोड रिस्टोरींग व हायड्रालिक टेस्टिंग सुरू आहे.

इरई धरणातील पंपहाऊसचे विस्तारीकरण

इरई धरणातील हेडवर्क्समधील पंप हाऊस विस्तारीकरणाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले. त्यातील तीन लाख लिटर बीपीटीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. ९०० मीमी व्यासाच्या जलवाहिणीचे काम पूर्ण झाले. प्रकल्पाच्या तांत्रिक व वीज कामांसाठी ५ कोटी १५ लाखांचा निधी खर्च झाला आहे.

झोननिहाय पाण्याची टाकी
तुकूम, शास्त्रीनगर, बंगाली कॅम्प, नेताजी नगर बाबूपेठ, बाबुपेठ हायवे, रेव्हनी कॉलनी व वडगाव येथील एकून आठ पाण्याच्या टाकींचे ९४ टक्के बांधकाम पूर्ण झाले. महाकाली झोनमधील टाकीचे काम ९१ टक्क्यांवर थांबले. किरकोळ कामेही शिल्लक आहेत.

पाईपलाईन ८८ टक्क्यांवर अडले
तुकूम व रामनगर झोनमध्ये ९००, ६००, ४५०, ४०० आणि ३०० एमएम व्यासाच्या पाईप लाईनचे काम ८८ टक्क्यांवर अडले. गुरूत्ववाहिनीची कामे १०० टक्के पूर्ण करण्याचे मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. बाबुपेठ येथील पाण्याच्या टाकीसाठी ३५० व ४०० एमएम व्यासाचे पाईप लाईन काम पूर्ण झाले आहे.

अमृत योजनेच्या सर्वच कामांची गती वाढविण्यात आली. त्यामुळे शहरातील दोन झोनमध्ये पाणीपुरवठा सुरू होऊ शकला. महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार, प्रकल्पाची शिल्लक राहिलेली सर्वच कामे विहित कालावधीत पूर्ण केली जाणार आहेत.
-विजय बोरीकर,
अभियंता (पाणीपुरवठा) मनपा, चंद्रपूर

 

Web Title: Chandrapurkar will have to wait for six months for 'Amrut'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.