लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होणार हे निश्चित असल्याचा दावा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केला. सोमवारी दुपारपर्यंत यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. भाजपकडून संगीता खांडेकर या महापौरपदाच्या अधिकृत उमेदवार असून, चर्चेत सहभागी असलेले सर्व पक्ष त्यांना पाठिंबा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महापौर निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून, निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी चर्चा अंतिम टप्प्यात असून, चर्चा पूर्ण होताच लेखी करार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हा करार भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या मंगळवारी होणाऱ्या आमसभेत चर्चेत सहभागी पक्ष भाजपच्या उमेदवाराला अधिकृत पाठिंबा जाहीर करतील. तसेच चर्चेनुसार इतर पदे संबंधित पक्षांना देण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.
उद्धवसेनेचा महापौर होणार का?
काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपने उद्धव ठाकरे यांच्या उद्धवसेनेला सव्वा वर्ष महापौरपदाची ऑफर दिली असल्याचे समजते.या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचा महापौर होणार का, याबाबत विचारले असता राजकीय चर्चा या इन-कॅमेरा असतात.त्या बाहेर मांडणे शिष्टाचाराचा भंग ठरेल, त्यामुळे यावर सध्या भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे मुनगंटीवारांनी स्पष्ट केले.
मनपासाठी संपूर्ण ताकद लावणार - मुनगंटीवार
संगीता खांडेकर निश्चितपणे महापौर होतील, असा ठाम विश्वास व्यक्त करताना मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर महानगरपालिकेच्या निधी व विकासकामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्वतः चर्चा केली असून, संपूर्ण शक्तीनिशी मनपाच्या पाठीशी उभे राहणार आहोत. काँग्रेसशी निवडणूकपूर्व आघाडी असलेल्या काही पक्षांशी संपर्क झाला असला, तरी सध्या ते थेट भाजपला पाठिंबा देण्याच्या मनःस्थितीत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Summary : BJP will secure Chandrapur's mayor position, Mungantiwar asserts. Sangita Khandekar is the official candidate, expected to receive support. Discussions with supporting parties are in the final stages, with a written agreement pending. Mungantiwar assures full support for the municipality's development.
Web Summary : मुनगंटीवार का दावा है कि भाजपा चंद्रपुर के महापौर पद को सुरक्षित करेगी। संगीता खांडेकर आधिकारिक उम्मीदवार हैं, जिनसे समर्थन मिलने की उम्मीद है। समर्थन करने वाली पार्टियों के साथ बातचीत अंतिम चरण में है, लिखित समझौता लंबित है। मुनगंटीवार ने नगरपालिका के विकास के लिए पूर्ण समर्थन का आश्वासन दिया।