लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्व ६६ जागांचा निकाल शुक्रवारी (दि. १६) जाहीर झाला असून, तब्बल १५ जागांची बढती घेत २७ जागांवर विजय मिळवत काँग्रेसने मनपात जोरदार पुनरागमन केले आहे. दुसरीकडे भाजपची घोडदौड २३ जागांवरच थांबली असून, मागील निवडणुकीच्या तुलनेत पक्षाला १३ जागांचा फटका बसला आहे. उद्धवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीने पहिल्यांदाच आठ जागा जिंकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काँग्रेससोबत युतीत असलेल्या जनविकास सेना (शेकाप) ने तिन्ही जागांवर विजय मिळवल्याने काँग्रेस आघाडीची संख्या ३० वर पोहोचली आहे. बसपाने एक जागा जिंकत अस्तित्व कायम राखले आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीलाच उद्धवसेनेने पाच जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली होती. त्यानंतर भाजप व काँग्रेसने खाते उघडले. भाजप बहुमताच्या दिशेने वाटचाल करेल, असे चित्र असतानाच काँग्रेसने संथ पण ठोस कामगिरी करत अखेरच्या टप्प्यात २७जागांपर्यंत मजल मारली. जनविकास सेनेच्या तीन जागांच्या साथीमुळे काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या आशा उंचावल्या आहेत. मनपावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी अवघ्या चार जागांची गरज असून, हे समीकरण काँग्रेससाठी अवघड मानले जात नाही.
राज्यभर भाजपला पोषक वातावरण असतानाही चंद्रपुरात काँग्रेसने मारलेली मुसंडी चर्चेचा विषय ठरली आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभांमधून पक्षातील अंतर्गत गटबाजीवर थेट भाष्य करत जनतेचा विश्वास संपादन केला. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार हे दिग्गज नेते प्रचारात असतानाही अपेक्षित यश मिळू शकले नाही. तिकीट वाटपातील गोंधळ, अंतर्गत मतभेद आणि एकवाक्यतेचा अभाव भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
निकालाची पक्षनिहाय तुलनात्मक टॅली आता मिळालेल्या जागा गेल्या वेळी वाढ/घटभाजप २३ ३६ -१३शिंदेसेना ०१ ०२ -१काँग्रेस २७ १२ +१५राष्ट्रवादी काँग्रेस ०० ०२ -०२भाशेकाप (जविसेना) ०३ ०१ +०२उद्धवसेना ०६ ०३ +०३मनसे ०० ०२ -०२वंचित ०२ ०० +०२एमआयएम ०१ ०० +०१बसप ०१ ०८ -०७इतर ०२ ०३ -०१
उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांनी वंचित बहुजन आघाडीशी केलेली युती 'गेमचेंजर' ठरली असून, वंचितने दोन जागांसह खाते उघडले आहे. मतदारांनी दिलेला हा कौल स्थानिक प्रश्न, शहरातील विकासकामे, महागाई, बेरोजगारी आणि मनपा कारभारावरील नाराजीचा परिणाम मानला जात आहे. बंडखोर उमेदवारांमुळे काही प्रभागांत काँग्रेसला फटका बसला असला, तरी एकूण निकालात काँग्रेसची सरशी ठळकपणे दिसून आली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढली. मात्र या दोन्ही पक्षांना भोपळाही फोडला आला नाही. नागिरकांनी या पक्षांना सपशेल नाकारले. तसेच मनसेचीही हीच गत झाली.
Web Summary : In Chandrapur Municipal Corporation elections, Congress strongly rebounded with 27 seats, while BJP slipped to 23. Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) - Vanchit Bahujan Aghadi alliance secured eight seats. Internal disputes hurt BJP despite prominent leaders campaigning.
Web Summary : चंद्रपुर नगर निगम चुनावों में कांग्रेस ने 27 सीटों के साथ जोरदार वापसी की, जबकि भाजपा 23 पर फिसल गई। शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे) - वंचित बहुजन आघाडी गठबंधन ने आठ सीटें हासिल कीं। प्रमुख नेताओं के प्रचार के बावजूद आंतरिक विवादों ने भाजपा को नुकसान पहुंचाया।