चंद्रपूर (गडचांदूर) : माणिकगड येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या डम्पिंग यार्डमधून सतत येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या संतापाला रविवारी (दि.२०) रात्री उधाण आले. शिवसेनेचे माजी नगरसेवक सागर ठाकूरवार यांनी नागरिकांच्या भावना व्यक्त करत कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या काचा फोडून तीव्र निषेध नोंदवला.
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. २१) दुपारी १२ वाजता, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेल्या सर्वपक्षीय मोर्चाने कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने केली. नागरिक, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकत्र येत, कंपनीच्या प्रदूषण कारभाराविरोधात एकमुखाने आवाज उठविला. आंदोलनस्थळी विविध नागरिकांनी आपली मते व्यक्त केली व कंपनीला स्पष्ट शब्दांत इशारा दिला त्यात मनोज भोजेकर, निलेश ताजने, सचिन भोयर, धनंजय छाजेड, मधुकर चुनारकर, संदीप शेरकी, विक्रम येरणे, आशिष देरकर, रफिक निजामी, सतीश बिडकर, हंसराज चौधरी, अरुण निमजे आदींसह पाचशेहून जास्त सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश होता.
कंपनीकडून आश्वासन
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश गहेलोत यांनी आंदोलनस्थळी येत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट सांगितले की, येणाऱ्या काळात शहरात दुर्गंधी पसरणार नाही याची हमी आम्ही देतो. त्यासाठी कंपनीकडून तांत्रिक उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. तसेच, पुढील पाच ते सहा महिन्यांत गडचांदूर शहर धुळीच्या प्रदूषणापासूनही मुक्त करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
नागरिकांचा निर्धार
या आंदोलनातून गडचांदूरकरांनी एकमुखाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, जर कंपनीने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल. गडचांदूर वासीयांचा श्वास घेण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या प्रदूषणकारी कारखान्याचा निषेध करून, नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.