ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या विरोधात भाजप तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 01:38 AM2019-09-08T01:38:00+5:302019-09-08T01:38:36+5:30

विजय वडेट्टीवारांची या मतदार संघातून पहिलीच टर्म असताना गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी पक्षातील आमदारांना लाजवेल इतका निधी त्यांनी या मतदार संघासाठी खेचून आणला आहे

BJP looking for candidate for victory against Vijay Vadettiwar in Brahmapur | ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या विरोधात भाजप तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या विरोधात भाजप तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात

Next

राजेश भोजेकर

चंद्रपूर : विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील दुसरे हेवीवेट नेते. ब्रह्मपुरी हा त्यांचा मतदार संघ. या मतदार संघात सत्ताधारी भाजप हा तुल्यबळ पक्ष असला तरी काँग्रेसच्या वडेट्टीवारांना पुरुन उरणारा उमेदवारच नाही. घरातीलच इच्छुकाला पुढे करायचे वा उमेदवार आयात करायचा, यावर भाजपात खलबते सुरू आहे.

विजय वडेट्टीवारांची या मतदार संघातून पहिलीच टर्म असताना गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी पक्षातील आमदारांना लाजवेल इतका निधी त्यांनी या मतदार संघासाठी खेचून आणला आहे. गोसेखुर्दचे पाणी आसोलामेंढा धरणात आणून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. तसेच घोडाझरी प्रकल्पातही पाणी आणण्यासाठी शासनाला निधी देण्यास भाग पाडले.

राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाची माळ वडेट्टीवारांच्या गळ्यात पडली. या संधीचे सोने करत त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले.

येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मात देईल, असा चेहरा भाजपकडे दिसत नाही. माजी आमदार प्रा. अतुल देशकर हे या क्षेत्रात वडेट्टीवारांचे विरोधक म्हणून गेल्या पाच वर्षांत फारसे प्रभाव निर्माण करू शकले नाही. नेमकी हीच बाब हेरुन भाजपचेच वसंत वारजुकर हे देशकरांची तिकीट कापून ते आपल्याला मिळावे, यासाठी वरिष्ठांकडे चकरा मारत आहेत. भाजपची ही अडचण हेरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनीही भाजपकडून तिकिटासाठी आतून प्रयत्न चालविले आहेत. त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याचेही त्यांचे समर्थक सांगतात.

श्रमिक एल्गारच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यात वडेट्टीवारांना शह देणारा चेहरा अद्याप पुढे आलेला नाही, असे चित्र आहे.

पाच वर्षांत काय घडले?
वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी नगर परिषदेवर काँग्रेसचा एकहाती झेंडा फडकविला. चंद्रपूरात काँग्रेस पक्षाचा एकमेव खासदार निवडून आणला. काँग्रेसश्रेष्ठींनीही त्यांना विरोधी पक्षनेतेपद बहाल केले.
गोसेखुर्द, नलेश्वर, आसोलामेंढा व घोडाझरी प्रकल्पाच्या माध्यमातून हे क्षेत्र सुजलाम् सुफलाम् होण्याच्या दिशेने गतीने वाटचाल करीत आहे. सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणे सुरू झाले आहे.
राज्यात सत्ता असतानाही भाजप या क्षेत्रात गेल्या पाच वर्षांपासून कमकुवत दिसत आहे.
लोकसभेत लक्षवेधी मते घेणारी वंचित वहुजन आघाडीही अद्याप हालचाली करताना दिसत नाही. विरोधी मतांची फाटाफूट पथ्यावर पडणार का?

गेल्या पाच वर्षांत ब्रह्मपुरी मतदार संघात विकासकामे तर केलीच. शिवाय, मतदार संघातील प्रत्येकाला आपला मुलगा वाटावा, बहिणीला आपला भाऊ वाटावा, एकूणच आपलेच कुटुंब समजून जगलो आहे. काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे विरोधी पक्षाकडे बघताना मला विरोधकच दिसत नाही. - विजय वडेट्टीवार, आमदार, ब्रह्मपुरी मतदारसंघ.

Web Title: BJP looking for candidate for victory against Vijay Vadettiwar in Brahmapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.