भाजपमुक्त महाराष्ट्राची सुरुवात चंद्रपूरमधून करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:34 IST2021-09-17T04:34:05+5:302021-09-17T04:34:05+5:30
भद्रावती : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती ...

भाजपमुक्त महाराष्ट्राची सुरुवात चंद्रपूरमधून करणार
भद्रावती : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकणार असून येत्या काळात चंद्रपूर जिल्हा भाजपमुक्त जिल्हा होणार, असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.
ते भद्रावती येथे झालेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा, सरपंचांचा सत्कार व विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलत होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वरोरा विधानसभा क्षेत्रातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
याप्रसंगी पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार म्हणाले, देशात काँग्रेसने हरित क्रांती केली. त्यामुळे अन्नासाठी इतर देशांसमोर हात पसरण्याची पाळी आपल्यावर येत नाही. परंतु या देशातील शेतकरी तीन काळा कायद्याविरोधात रस्त्यावर उतरला आहे. त्यांचे म्हणणेदेखील मोदी सरकार ऐकून घेत नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देवीदास काळे, महासचिव अविनाश वारजुरकर, माजी आमदार देवराव भांडेकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेस शहराध्यक्ष रामू तिवारी यांची उपस्थिती होती.
बॉक्स
नाना पटोले आलेच नाही
भद्रावती येथील या कार्यकर्ता मेळाव्याला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे येणार होते. यानिमित्त त्यांचे जिल्ह्यात स्वागताचे बॅनरही ठिकठिकाणी लावले होते. मात्र काही कारणास्तव ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.
बॉक्स
यांचा झाला कॉंग्रेसप्रवेश
यावेळी वरोरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू चिकटे व वासुदेव ठाकरे आणि संचालकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. विधानसभा क्षेत्रातील ३० हून अधिक वेगवेगळ्या पक्षातील ग्रामपंचायतीचे सरपंच व त्यांचे सदस्य, भद्रावती नगरपालिकेच्या भाजपच्या तीन महिला नगरसेविका निला ढुमणे, जयश्री दातारकर, प्रतिभा निमकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. वरोरा नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते गजानन मेश्राम यांच्यासह शिवसेनेच्या सात नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजू महाजन, सनी गुप्ता, चंद्रकला चिमूरकर, पंकज नाशिककर, राशी चौधरी, राखी काळपांडे या नगरसेवकाचा यात समावेश आहे.
160921\1455-img-20210916-wa0002.jpg~160921\img-20210916-wa0003.jpg
अरूण अध्येंकीवार~फोटो