बालविश्वाचे ‘समर कॅम्प’ उपयोगिता की फॅड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:43 PM2019-04-27T23:43:59+5:302019-04-27T23:44:58+5:30

मुलांच्या विकासासाठी विविध प्रकारचे ज्ञान व मनोरंजनात्मक उपक्रमांची आज खरोखरच गरज आहे. परंतु, संबंधित विषयांचे तज्ज्ञ शिकविण्यासाठी नसताना उन्हाळी शिबिरांच्या नावाखाली जिल्ह्यात नवेच पीक उगविल्याचे दिसून येत आहे.

Baldwin's 'summer camp' utility fad? | बालविश्वाचे ‘समर कॅम्प’ उपयोगिता की फॅड?

बालविश्वाचे ‘समर कॅम्प’ उपयोगिता की फॅड?

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । सुजाण पालकांचा प्रश्न; तज्ज्ञ मार्गदर्शक नसतानाही शिबिरांचे पीक

राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मुलांच्या विकासासाठी विविध प्रकारचे ज्ञान व मनोरंजनात्मक उपक्रमांची आज खरोखरच गरज आहे. परंतु, संबंधित विषयांचे तज्ज्ञ शिकविण्यासाठी नसताना उन्हाळी शिबिरांच्या नावाखाली जिल्ह्यात नवेच पीक उगविल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे दामदुप्पट शुल्क भरून पालक अशा समर कॅम्पमध्ये आपल्या पाल्यांना पाठवू लागले आहेत. त्यामुळे या शिबिरांचा खरोखरच उपयोग होत आहे की केवळ फॅड, असा प्रश्न सुजाण पालक विचारू लागले आहेत.
उन्हाळी शिबिरांमध्ये नवीन गोष्टी शिकवल्या जातात. रचनात्मक नवीन वस्तू निर्मिती वगैरे. पण खरेच हे गरजेचे आहे का? मुलांनी प्रत्येक वेळेला काही तरी शिकायलाच हवे. सुट्ट्यांमध्येही त्यांनी शिस्त पाळावी, शिबिरांमध्ये दिलेला होमवर्क पूर्ण करावा. मुलांनी मनसोक्त खेळावे. कुणाचेही कसलेही बंधन नसावे. सुट्टीचा मनमुराद आनंद लुटावा, असे पालकांना वाटणे स्वाभाविक आहे. प्रत्येक गोष्टीत तुलना व स्पर्धेचा विचार करणे योग्य नाही. वर्गातल्या मुलांनी अमका क्लास लावला. मग तुही जा त्या क्लासला... तमक्याने पोहण्याचा क्लास लावला मग तूही जा पोहायला... अशी अनुकरणप्रियता घातक ठरू शकते. पण, पालकांच्या अपेक्षा अवास्तव झाल्या. यातूनच कुठल्याही सुविधा नसताना शुल्क घेऊन उन्हाळी शिबिर घेण्याची टूम आता जिल्ह्यात निघाल्याचे दिसून येत आहे.
आदर्श पायंडा
काही कुटुंबांमध्ये अशीही परिस्थिती आहे की, मुलांना विविध शिबिरांमध्ये पाठविले नाही तर तो मागे पडेल, अशी धास्ती पालकांना वाटते. त्यामुळे शिबिराचे शुल्क अधिक असूनही ते पाल्यांना शिबिरात घालतात. हा खर्च अनाठायी आहे, असे म्हणणारेही काही पालक चंद्रपुरात आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नि:शुल्क उन्हाळी शिबिर घेऊन आदर्श पायंडा पाडला. शिबिरात विविध विषयांचे तज्ज्ञ मुलांना व्यक्तिमत्त्व विकासाचे उत्तम धडे देत आहेत.
कल ओळखून घ्यावा निर्णय
मुलांचा कल ओळखून पालकांनी निर्णय घेतला पाहिजे. प्रत्येक बालक वेगवेगळ्या परिस्थितीतून घडत असतो. त्यांच्या विचारविश्वाचा विचार करूनच पालकांनी दिशा ठरवली पाहिजे. पाल्याबद्दल अवास्तव आशा न ठेवता बौद्धिक क्षमता व कुटुंबाची पार्श्वभूमी नजरेआड करणे अनाठायी आहे. अनुकरणातून मुलांच्या आयुष्याला आकार मिळेलच, असेही नाही.

Web Title: Baldwin's 'summer camp' utility fad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.