तलावांमध्ये सरासरी २६% पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:01 AM2019-05-04T00:01:57+5:302019-05-04T00:02:20+5:30

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाचे पाण्याचे स्रोत म्हणजे तलाव. मात्र जिल्ह्यातील अनेक तलाव सध्या कोरडे पडले आहे. शासनाने गाव तिथे तलाव, बोडी तयार केल्या होेत्या. परंतु पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दरवर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे.

Average water in ponds is 26% | तलावांमध्ये सरासरी २६% पाणी

तलावांमध्ये सरासरी २६% पाणी

Next
ठळक मुद्देबहुतांश तलावात ठणठणाट : जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाचे पाण्याचे स्रोत म्हणजे तलाव. मात्र जिल्ह्यातील अनेक तलाव सध्या कोरडे पडले आहे. शासनाने गाव तिथे तलाव, बोडी तयार केल्या होेत्या. परंतु पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दरवर्षी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे तलाव, बोड्यांमध्ये पाण्याची साठवणूक होत नाही. यावेळीही तसेच झाले. मात्र आता जिल्ह्यातील अनेक तलाव, बोड्यांमध्ये पाणी नसून ते कोरडे पडले आहे. जिल्ह्यात लहान-मोठे असे मिळून एकूण ९७ तलाव आहेत. या तलावांमध्ये सरासरी २६.६३ टक्केच पाणी आहे, हे विशेष.
चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेले तलाव हे एखाद्या मैदानासारखे झाले आहे. ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात चारा टंचाईमुळे शेतकरी आपले जनावरे मोकळ्या जागेत सोडतात. परंतु या जनावरांना आता तलावात पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांना घरीच पाणी पाजावे लागत आहे. यंदा आधीच तलावांमध्ये पाणी नव्हते. त्यात शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याचा वापर केला व आता पाण्याविना तलाव कोरडे पडले आहे. शासनाने लाखो रूपये खर्च करून तलाव व बोडी तयार केल्या. परंतु पाणीच नसल्याने त्याचा ऐन उन्हाळ्यातच उपयोग होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांनाही पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे.
अशीच जर परिस्थिती राहिली तर भविष्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल. प्रशासनाने ही बाब लक्षात घेउन एक ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

नळ योजनांचाही बट्ट्याबोळ
शासनाने विविध गावांमध्ये नळयोजना सुरू केली. परंतु अनेक गावात नळ योजनेचा फज्जा उडालेला दिसत आहे. काही नळ योजना तांत्रिक अडचणीमुळे तर काही ग्रामपंचायतेच्या उदासीन धोरणामुळे बंद आहे. अनेक गावात नळयोजनेंतर्गत बांधलेल्या टाक्या या फक्त शोभेच्या वस्तू बनल्या आहे. नळ योजने अंतर्गत नाला, नदीच्या माध्यमातून गावागावात पाणी पोहचवण्यासाठी शासनाने प्रयत्न केले व लाखो रूपयांचा निधी प्रत्येक गावात खर्च केला. परंतु शासनाचा उद्देशच असफल झाल्याचे दिसते. जिथे नळ योजना बंद आहे, त्या गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची गरज आहे.

शेततळे व विहिरी कोरड्या
ग्रामीण भागात शासनाने लागेल त्याला विहीर व शेततळे दिले. मात्र पाऊस कमी पडल्याने शेततळे कोरडे असून विहिरीची पातळी ही दिवसागणिक खालावत आहे. पूर्वी विहिरी कमी होत्या, तसेच विंधन विहिरी नव्हत्या. परंतु सद्यस्थितीत अनेक शेतात व गावात विंधन विहिरीची निर्मिती झाली व पाण्याचा उपसा प्रचंड प्रमाणात वाढला. त्यामुळे पाण्याची पातळी खालावली. काही भागात तर २०० ते ३०० फुट विंधन विहीर खोदली तरी पाणी लागत नाही. अशा परिस्थितीमुळे नागरिक हैराण झाले आहे. पुढे सिंचनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

Web Title: Average water in ponds is 26%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.