वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व्यक्तींना तातडीची आर्थिक मदत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 01:08 IST2016-11-18T01:08:30+5:302016-11-18T01:08:30+5:30
वन्यप्राणी मानवावर हल्ला करून जखमी केल्याच्या घटनामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व्यक्तींना तातडीची आर्थिक मदत नाही
स्वत: करावा लागतो खर्च : तातडीच्या निधीची तरतूद नाही
वरोरा : वन्यप्राणी मानवावर हल्ला करून जखमी केल्याच्या घटनामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची नोंद तातडीने वनविभागात केली जाते. रुग्णालयात जावून वन कर्मचारी अधिकारी जखमीचे बयाण नोंदवितात. परंतु तातडीच्या आर्थिक मदतीची तरतूद नसल्याने जखमींना तातडीची मदत मिळत नसल्याने वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक व्यक्ती शासकीय रुग्णालयाच्या व्यतिरिक्त असलेल्या औषधोपचारापासून वंचित राहात आहेत.
वन्यप्राण्यांचा हल्ला शेतात वा गावात होत असतो. या घटना नित्याच्या झाल्या आहेत. शेतीच्या हंगामात अशा अनेक घटना घडत असतात. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीस उपचाराकरीता जखमीचे आप्तेष्ठ मिळेल त्या वाहनाने शासकीय-खाजगी रुग्णालयात दाखल करून त्याबाबत वन विभागाच्या कार्यालयात नोंद करतात. नोंद केल्यानंतर वन कर्मचारी व अधिकारी जखमीचे बयाण घेवून निघून जातात. जखमीला प्राथमिक उपचारानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास खाजगी रुग्णवाहिकेमधून न्यावे लागते. त्यामुळे अनेकदा आप्तेष्टांजवळ पैसे नसल्यास जखमीला तिष्ठत राहावे लागते. शासकीय रुग्णालयात औषधी नसल्यास आर्थिक कमकुवतपणामुळे बाहेरून औषधी घेता येत नाही. ंअशी एक ना अनेक संकटे जखमी व त्यांच्या आप्तांसमोर उभी राहतात. त्यामुळे जखमीना तातडीचा आर्थिक निधी मिळावा, याकरिता तरतूद करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वनाधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वत: करतात मदत
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती वनधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळताच ते घटनास्थळी किंवा रुग्णालयात जखमीचे बयाण नोंदविण्यासाठी जातात. त्यावेळी त्यांच्यामधील माणुसकीचा झऱ्याला पाझर फुटते. जखमीची अवस्था बघून अनेक वनाधिकारी व वनकर्मचारी आपल्या खिश्यामधून वन्यप्राण्याच्या हल्ल्यातील जखमींना अनेकदा मदत करीत असतात. (तालुका प्रतिनिधी)