Aloe multifunctional medicinal plant algae | झाडीपट्टीतील रानात फुलले बहुगुणी औषध वनस्पती कोरफड

झाडीपट्टीतील रानात फुलले बहुगुणी औषध वनस्पती कोरफड

ठळक मुद्देसंडे अ‍ॅन्कर । खडसंगीतील एका युवा शेतकऱ्याचा प्रयोग, इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी

राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : सौंदर्य जोपासण्यासाठी आणि आहे ते तारुण्य चिरकाल अबाधित राहावे, ही नैसर्गिक इच्छा प्रत्येकाची असते. मात्र, ही इच्छा फलद्रूप होण्यासाठी शरीर चिरतरुण आणि महागडा औषधोपचार टाळण्यासाठी आयुर्वेदाने कोरफडीचा उपयोग नामी मानला आहे. शरीराअंतर्गत हालचालीवर नियंत्रण ठेवण्याबरोबर आधुनिक जीवनशैलीशी निगडित उपचारपद्धती ही आजकालची फॅशन ठरू लागली आहे. याच आधुनिक जगासाठी चंद्रपूर जिल्ह्यतील चिमूर सारख्या दुष्काळी तालुक्यातील खडसंगी येथील एका युवकाने पारंपरिक शेतीला फाटा देऊन तीन एकर शेतीमध्ये नवीन प्रयोग म्हणून कोरफड लागवड करून झाडीपट्टीत कोरपड फुलविली आहे.
चिमूर तालुक्यातील खडसंगीचे धनंजय औतकर या २८ वर्षीय युवकांनी बीएस्सी कॉम्प्युटर मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेऊन काही काळ नागपुरात एका कंपनीत नोकरी केली. मात्र मनात वेगळं करण्याची जिद्द असल्याने धनंजयने जयपूर येथे ऑरगॅनिक शेतीचे प्रशिक्षण करून वर्धा येथे ऑरगॅनिक खताचेही प्रशिक्षण घेतले व शहरातील जीवनापेक्षा गावाकडील जीवनात रमण्याच्या उद्देशाने खडसंगी येथे राहून वडिलोपार्जित पारंपारिक शेतीला फाटा देत नाविन्यपूर्ण शेती करून इतर शेतकºयापुढे आदर्श निर्माण करण्याच्या प्रयत्न केला आहे.
खडसंगी जवळील बरडघात गावातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी रानबोडी येथील तीन एकर जमिनीत धनंजयने चवदा महिन्यांपूर्वी कोरफड रोपांची लागवड केली. जमीन हलकी, मध्यम अथवा काळी असली तरी चालते. मात्र, पाण्याचा निचरा होणारी असणे आवश्यक आहे. अन्यथा पाणथळ जमिनीत याची लावण केली तर मुळे कुजून रोपांचे नुकसान तर होतेच, कोरफडही जळून जाते.
एका रोपाला हलक्या जमिनीत दर आठ दिवसांनी, मध्यम जमिनीत दहा १० तर भारी जमिनीसाठी १५ दिवसांनी दोन ते तीन लिटर पाणी पुरेसे ठरते. पावसाने दगा दिला अथवा पाण्याची सुविधा जर या वेळेत उपलब्ध झाली नाही तर रोप वाळण्याची अजिबात भीती नाही.

वार्षिक तीन ते चार लाख उत्पादन
कोरफडीचे एक रोप पाच वर्षापर्यंत उत्पन्न देत राहते. एका झाडापासून सहा ते सात किलो गर निघतो दर सहा महिन्याने या झाडाच्या पानांची व गराची विक्री करता येते. हेक्टरी ५० ते ६० टन उत्पादन होणार आहे. यातून वार्षिक साधारण तीन ते चार लाख उत्पन्न होते, असे धनंजय औतकर यांनी लोकमतला सांगितले.
कमी पाण्यावर होते शेती
या पिकासाठी सिंचनव्यवस्था पाटपाणी, ठिबक याद्वारे करण्यात आली असून दोन तीन महिन्यात पाणी दिले जाते. याचे प्रमाणही कमी असल्याने उपलब्ध पाण्यात तीन एकर कोरफड शक्य ठरली आहे. आंतरमशागत करता येत नसल्याने नांगरणी आणि सेंद्रिय खत, शेणखत याचाच प्रामुख्याने वापर केला तरच कोरफडीपासून औषधी गुणधर्म चांगल्या पद्धतीने मिळतात.

कोरपड आहे बहुगुणी औषध
कोरफडीचा वापर प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधनासाठी केला जात असला तरी शरिराला लागणारी वेगवेगळे आम्ले, खनिजे याची मात्रा कोरफडीमध्ये असते. त्यामुळे कोरफडीपासून तयार करण्यात येत असलेल्या पदार्थाच्या नित्य सेवनाने शरिरातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम होते. जर रक्तातील साखरेचे प्रमाण १२५ हून कमी झाले तर वाढविण्याचे आणि अतिरिक्त साखर झाली तर कमी करण्याचे काम होते. तसेच उंचीनुसार आवश्यक तेवढेच वजन ठेवण्याचे कामही केले जाते. याचबरोबर शरीरातील विषारी पदार्थाबरोबरच मृत पेशी बाहेर काढून नवीन पेशीनिर्मितीचे कामही केले जाते. त्यामुळे कोरपड हे बहुगुणी वनस्पती औषध आहे

Web Title: Aloe multifunctional medicinal plant algae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.