शेती पाण्यात, शेतकरी संकटात पंचनाम्याची पथके गेली कुठे? कापूस, सोयाबीन व धान पिकांचे प्रचंड नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 19:05 IST2025-11-01T19:04:21+5:302025-11-01T19:05:37+5:30
शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी : पीक वाचविण्यासाठी सुरू आहे धडपड

Agriculture in water, farmers in distress, where did the Panchnama teams go? Huge damage to cotton, soybean and paddy crops
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून परतीच्या पावसाने झोडपल्याने कापूस, सोयाबीन व धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले. बुधवारी (दि. २९) तर पावसाने कहर केला. शेकडो हेक्टर क्षेत्रातील पीक पाण्याखाली आले. धानाच्या बांधीतील पीक सडण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पंचनामा करण्यासाठी प्रशासनाचे पथक शुक्रवारी (दि. ३१) नुकसानग्रस्त शिवारात पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सद्यःस्थितीत हलका व मध्यम कालावधीचा धान कापणीच्या टप्प्यात आला. लवकर रोवणी झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी तर हा धान कापून सुकविण्यासाठी बांधीत सरड्या ठेवल्या आहेत. मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपूरी, नागभीड, गोंडपिपरी व पोंभुर्णा तालुक्यातही अनेक शेतकऱ्यांची कापणी पूर्ण झाली. सावली तालुक्यातील व्याहाड बुज., वाघोलीबुट्टी, सामदा, सोनापूर, कापसी, उपरी, पेठगाव, भांसी, डोनाळा, कढोली, हरांबा, लोंढोली, साखरी, सिर्सी, जांब, केरोडा, व्याहाड खुर्द, मोखाडा शिवारात हलक्या धानाची कापणी अंतिम टप्प्यात आहे. परंतु, या परिसरात मागील चार दिवस जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाले. शेतकरी संकटात सापडले आहेत.
चिमूर तालुक्यातही प्रचंड नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी व महसूल विभागाला माहिती दिली. मात्र, शुक्रवारी (दि. ३१) एकही पथक नुकसानग्रस्त शिवारात पोहोचले नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पंचनाम्यानंतर वाढणार नुकसानीचा आकडा
प्राथमिक अंदाजानुसार दीड हजार हेक्टर क्षेत्रावर शेतमालाचे नुकसान झाले आहे. यात धान, कापूस, सोयाबीन, तूर व भाजीपाला पिकांचा समावेश आहे. नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांची संख्याही दीड हजारपेक्षा होण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांनी तलाठी व ग्रामसेवकाला माहिती दिली. काही ठिकाणी तलाठ्यांनी शिवाराची पाहणी केली. मात्र, कृषी विभागाचे कर्मचारी तिथे उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे रितसर पंचनामा प्रक्रियेला सुरूवातच झाली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या जिल्हाभरात ढगाळ वातावरणाचे सावट आहे. पंचनामे झाल्यानंतर नुकसानीचा आकडा वाढू शकतो.
चार तालुक्यांत सर्वाधिक नुकसान
पावसाने चिमूर तालुक्यात ३ हजार १७.५३ हेक्टर बाधित झाले होते. याचा फटका ३ हजार ४१८ शेतकऱ्यांना बसला. वरोरा तालुक्यातही ५९२.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. याचा एक हजार ४०८ शेतकऱ्यांना तडाखा बसला होता. याशिवाय, नागभीड व सिंदेवाही तालुक्यातही प्रचंड नुकसान झाले. याची भरपाई अद्याप मिळाली नाही. आता पावसाने तोंडातला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला. मात्र, पंचनाम्याची कार्यवाही सुरू झाली नाही.
शेतकऱ्यांना सरकारी मदतीची प्रतीक्षा
जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १ लक्ष १० हजार ६६५ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा १ लक्ष २६ हजार २८६ शेतकऱ्यांना तडाखा बसला होता. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत २४ हजार ९८ शेतकऱ्यांच्या खात्यात ६७ कोटी ४३ लक्ष २८ हजार रुपये जमा केले आहे. उर्वरित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.