एक वर्ष ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहिल्यानंतर युवक झाला पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 20:13 IST2022-03-02T20:07:50+5:302022-03-02T20:13:23+5:30
Chandrapur News प्रेमाच्या जाळ्यात अलगद अडकविल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या युवतीला वाऱ्यावर सोडून पसार झाल्याने एकाकी पडलेल्या युवतीने न्यायासाठी पोलिसांत धाव घेतली आहे.

एक वर्ष ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहिल्यानंतर युवक झाला पसार
चंद्रपूर : प्रेमाच्या जाळ्यात अलगद अडकविल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या युवतीला वाऱ्यावर सोडून पसार झाल्याने एकाकी पडलेल्या युवतीने न्यायासाठी पोलिसांत धाव घेतली आहे. पोलीस सध्या फरार अंकुशचा शोध घेत आहेत.
सावली तालुक्यातील घोडेवाही येथील रहिवासी अंकुश भास्कर मोहुर्ले हा या ना त्या माध्यमातून पीडितेच्या संपर्कात आल्यानंतर २०१७ मध्ये पीडितेशी प्रेमाचे सूत जुळविले. प्रस्थापित झालेल्या प्रेमसंबंधातून अंकुशने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून ३० जून २०१९ रोजी पळवून नेले. नागपूर परीसरातील नवीन नीलडोह भागात किरायाने घर घेऊन दोघेही पती-पत्नीसारखे राहू लागले. वर्षभर सोबत राहिल्यानंतर १८ जून २०२० ला अंकुश मोहुर्ले नोकरीचे कारण सांगून घराबाहेर पडला. तेव्हापासून तो परत आलाच नाही.
पीडितेने त्याच्याशी संपर्क साधण्याचा आणि इतरांकडून माहिती घेण्याचा बराच प्रयत्न केला; परंतु तो सापडला नाही. त्यानंतर पीडिता सावली येथे परतली. अखेर हतबल झालेल्या पीडितेने सावलीच्या पोलीस ठाण्यात अंकुश मोहुर्लेविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अंकुशविरुद्ध भादंवि ३६३, ३६६, ३७६ (२) सहकलम ४,६ बाललैंगिक कायदा सहकलम व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.