सासऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेताना अपघात, जावयाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:59+5:302021-07-05T04:17:59+5:30
शनिवारी सायंकाळी ६ वाजता हिरापूर येथील किसन चिडाम यांचा एका शेतात मृत्यू झाला. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून ...

सासऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेताना अपघात, जावयाचा मृत्यू
शनिवारी सायंकाळी ६ वाजता हिरापूर येथील किसन चिडाम यांचा एका शेतात मृत्यू झाला. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी त्यांच्या नातेवाइकाकडे सोपविण्यात आला. नातेवाइकांनी गावातली पिकअप वाहन भाड्याने घेतले. त्या वाहनात मृतदेह टाकून गावातील नागरिक व नातेवाईक शवविच्छेदनासाठी चिमूर येथे घेऊन गेले. दरम्यान, चिमूरजवळील खरकडा येथे अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याने पिकअपमध्ये बसून असलेले वाहनचालकासह इतर सहा लोक गंभीररित्या जखमी झाले. गावातील लोकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे भरती केले. त्यात जावई शंकर गोमा खंडाते यांचा रविवारी पहाटे ४ वाजता ग्रामीण रुग्णालय येथे मृत्यू झाला. एकीकडे सासऱ्याचा मृत्यू तर दुसरीकडे जावयाचाही मृत्यू. अकाली घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वाहनचालक रतन सोनटक्के, हरीश पंचवटे, गजानन कन्नाके, विजय चिडाम, राजू चिडाम सर्व रा. हिरापूर तर डोंगरगाव येथील दिलीप गोमा खंडाते हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.