साईनाथ कुचनकार ल्ल चंद्रपूरगणेशोत्सव भक्तीभावाने साजरा होत असला तरी निर्माल्याच्या माध्यमातून प्रदूषणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. धार्मिक भावना जुळल्या असल्याने प्रशासन यात हात घालत नाही. पर्यावरण प्रेमींनी जनजागृती करून निर्माल्य कुंडीत टाकण्याची विनंती करीत आहे. ही विनंतीही अनेकजण धुडकावत आहे. यातून नदी-तलाव प्रदूषित होत आहे. भविष्यासाठी धोकादायक ठरू पहात असलेले निर्माल्य भाविकांनी नदी-तलावात न टाकता कलश, ड्रममध्ये टाकल्यास भविष्यातील धोका टाळता येऊ शकतो.एकट्या चंद्रपूर शहराचा विचार केल्यास पाच हजारावर घरगुती तसेच २५० सार्वजनिक गणेश मंडळ आहे. या माध्यमातून गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. धार्मिक भावना जुळल्या असल्याने अनेक भाविक नदीचे पात्र, तलावात निर्माल्य टाकतात. प्रत्येकांकडून अर्धा, एक किलो निर्माल्य पात्रात टाकण्यात येते. सदर निर्माल्य एकत्र केल्यास पाच टनच्या वर जमा होते. हा विचार साधारण: कुणीच करत नाही. मात्र ही वास्तविकता ‘लोकमत’ने केलेल्या एका सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. यातून मोठ्या प्रमाणात नदी-तलाव प्रदूषित होत आहे.विशेष म्हणजे, घरगुतीच नाही तर सार्वजनिक गणेश मंडळही निर्माल्याच्या माध्यमातून प्रदूषण करीत आहे. प्रदूषणामध्ये चंद्रपूर शहराचा प्रथम क्रमांक आहे. यामुळे नागरिकांना अनेक आजारांना समोर जावे लागत आहे. अनेकांना आपला जीवही गमवावा लागत आहे. तरीही प्रदूषण टाळण्यासाठी आपण पाहिजे तसे प्रयत्न अद्यापही करीत नाही. सोबतच दिवसेंदिवस छोट्या मोठ्या सण, उत्सवाच्या माध्यमातून प्रदूषणात भरच टाकत आहो. चंद्रपूर शहरात ५ टन निर्माल्य जमा होत आहे. तर जिल्ह्यात किती होत असेल, हा विचारही न केलेला बरा.यावर्षी मनपा प्रशासनाने निर्माल्य प्रदूषण टाळण्यासाठी पाऊल उचलले आहे. इरईच्या पात्रामध्ये निर्माल्य टाकण्यासाठी दोन मोठमोठे खड्डे तयार करण्यात आले आहे. तर गणेश विसर्जनासाठी येथे विशेष सोय करण्यात आली आहे. मनपाने यावर्षी झोननुसार प्लॉस्टिकचे ड्रम खरेदी केले आहे. तसेच रामाळा तसेच इरईच्या पात्राजवळ ठेवण्यात येणार आहे. सोबतच आझाद बागेमध्येही विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य टाकण्यासाठी ड्रम ठेवण्यात येणार आहे. मंडळांनी या ड्रममध्ये निर्माल्य टाकल्यास प्रदूषनाचा थोडा का होईना प्रश्न आपल्याला टाळता येणार आहे.
अबब,चंद्रपुरात निघते पाच टन निर्माल्य
By admin | Updated: September 2, 2014 23:38 IST