चंद्रपूर: ट्रकची ऑटोला जबर धडक; तिघेजण जागीच ठार, तीन गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 22:56 IST2023-09-27T22:55:50+5:302023-09-27T22:56:47+5:30
चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील घटना

चंद्रपूर: ट्रकची ऑटोला जबर धडक; तिघेजण जागीच ठार, तीन गंभीर
चंद्रपूर : धावत्या ऑटोला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना बल्लारपूर मार्गावरील आंबेडकर पुलाजवळ बुधवारी सायंकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले.
ऑटोचालक इरफान बशीर खान (49) रा बाबुपेठ, संगीता अनिल चहांदे(56), साईनगर गडचिरोली, अनुष्का भारत खैरकार (22) बल्लारपूर असे मृतांची नावे आहेत. तर राजकला राजू मोहुले (34) रा. बाबूपेठ, गीता रामकृष्ण शेंडे (30), रा तुकूम, दशरथ रामाजी बोबडे (50) रा वणी असे जखमींचे नाव आहेत.
चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सायंकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ऑटो चंद्रपूर वरून प्रवासी घेऊन बल्लारपूरकडे निघाला होता. तर बल्लारपूरकडून चंद्रपूरकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या भारधाव ट्रकने ऑटोला जबर धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, ऑटोतील प्रवासी उसळून बाहेर फेकले गेले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. त्या सर्वांना जवळील पोद्दार हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याबाबतची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, एपीआय हिवरे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले व त्यांची चमू घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला.