चंद्रपूर : "बैल पोळा" म्हणजे शेतकऱ्यांचा सण, बैलांचा सन्मान आणि शेती संस्कृतीचा उत्सव. मात्र, बदलत्या काळासोबत आणि यांत्रिकीकरणाच्या झपाट्याने, बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. हे वास्तव स्वीकारत नवरगावच्या शेतकऱ्यांनी एक अभिनव पाऊल उचलत ट्रॅक्टर पोळा साजरा करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.
शेतकऱ्यांचा गौरवया आगळ्यावेगळ्या पोळ्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक ट्रॅक्टर मालकाला समितीच्या वतीने सन्मानचिन्ह आणि बक्षीस देऊन गौरवण्यात आले. केवळ साजरा करण्यापुरता नव्हे, तर शेतीतील बदल स्वीकारतानाही उत्सवाची भावना जपली जावी, हा या उपक्रमामागचा उद्देश ठळकपणे समोर आला.
बैलांची जागा घेतली ट्रॅक्टरनेकधी काळी गावागावांत बैलांच्या जोड्या दिसायच्या, प्रत्येक घराच्या अंगणात गोठा असायचा. बैलांच्या पाठीवर संपूर्ण शेती अवलंबून होती. मात्र, काळ बदलला. शेतीत आधुनिक यंत्रसामग्री आली. मजुरीचा तुटवडा, वेळेची मर्यादा आणि श्रमांची किंमत यामुळे ट्रॅक्टरने बैलांची जागा घेतली. शेतकऱ्याचं प्रेम आता ट्रॅक्टरवर केंद्रित झालं आहे.
नवरगावचा अनोखा 'ट्रॅक्टर पोळा'"ट्रॅक्टर पोळा उत्सव समिती, नवरगाव" यांच्या वतीने यंदा पारंपरिक पोळ्याला आधुनिक वळण देण्यात आले. बैलांच्या जागी सजवलेले ट्रॅक्टर रांगोळ्या, फेटे, पताका आणि फुलांनी सजवले गेले. प्रत्येक ट्रॅक्टर हा एक चालत बोलत आकर्षण ठरला. शिस्तबद्ध रॅलीमध्ये ट्रॅक्टरची मिरवणूक पाहण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती.
जिल्ह्यात औद्योगिकीकरणाचा शेतीवर परिणामचंद्रपूर जिल्हा पारंपरिकरित्या धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. धानासोबतच कापूस, तूर, सोयाबीन यांसारखी पिकेही येथे घेतली जातात. मात्र गेल्या काही वर्षात औद्योगिकीकरणाने वेग घेतल्यामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. सिमेंट उद्योग, कोळसा खाणी, वीज प्रकल्प, लोखंड उत्पादन यासारख्या उद्योगांमुळे एकीकडे रोजगार निर्माण झाला असला, तरी दुसरीकडे सुपीक शेती जमीन उद्योगांच्या घशात गेली आहे. परिणामी शेती क्षेत्र कमी झाले असून, पर्यावरणीय समतोल बिघडला आहे. यामुळे प्रदूषण वाढले असून, नागरिकांना आरोग्य व पाणीटंचाईसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.