चंद्रपुरातील ३८ दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात ! पडताळणी शिबिरात गैरहजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:34 IST2025-11-11T17:33:37+5:302025-11-11T17:34:08+5:30
Chandrapur : मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या आदेशानुसार दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही पडताळणी मोहीम पार पडली.

38 disabled employees in Chandrapur under suspicion! Absent from verification camp
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत वर्ग-३ व वर्ग-४ मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. ३ व ४ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या या विशेष शिबिरात एकूण २४४ कर्मचाऱ्यांपैकी २०६ कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून प्रमाणपत्राची पडताळणी पूर्ण केली. दरम्यान, ३८ कर्मचारी अनुपस्थित राहिल्यामुळे आता हे कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा प्रमाणपत्र पडताळणीसाठी मुभा देण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या आदेशानुसार दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही पडताळणी मोहीम पार पडली. मागील काही वर्षामध्ये दिव्यांगाच्या नावाने सुदृढ असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी योजनांचा लाभ घेतल्याचे बोलल्या जात आहे.
कारवाईची शक्यता
जिल्हा परिषदेने ३ आणि ४ नोव्हेंबरला दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणीसाठी शिबिर आयोजित केले होते. असे असले तरी तब्बल ३८ कर्मचारी गैरहजर होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी गैरहजर राहिल्यामुळे आता त्यांच्याकडे संशय वाढला आहे.
पुन्हा एक चान्स
अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना १३ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे मूळ दिव्यांगत्व प्रमाणपत्रासह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनुपस्थित कर्मचाऱ्यांची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. पडताळणीदरम्यान प्रमाणपत्र चुकीचे, बनावट किंवा दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी आढळल्यास, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.