टोलवरून घ्यायचे होते ३२ कोटी; वसूल केले २२५ कोटी
By Admin | Updated: August 18, 2014 23:23 IST2014-08-18T23:23:42+5:302014-08-18T23:23:42+5:30
राज्यातील नऊ टोल नाक्यांना एकत्रित करून ताडाळीच्या टोल नाक्यावरून वसूल होत असल्याचा प्रकार अलीकडेच प्रकाशात आला आहे. एवढेच नाही तर, २००४ पासून या नाक्यावरून बोगस पावत्या देऊन

टोलवरून घ्यायचे होते ३२ कोटी; वसूल केले २२५ कोटी
चंद्रपूर : राज्यातील नऊ टोल नाक्यांना एकत्रित करून ताडाळीच्या टोल नाक्यावरून वसूल होत असल्याचा प्रकार अलीकडेच प्रकाशात आला आहे. एवढेच नाही तर, २००४ पासून या नाक्यावरून बोगस पावत्या देऊन जनतेची आणि सरकारची सर्रास लूट सुरू असल्याचा आरोप विधान परिषद सदस्य शोभाताई फडणवीस यांनी केला आहे.
शासकीय अध्यादेशानुसार, हा टोल नाका २०१५ मध्येच बंद करायला हवा होता. मात्र, तसे न करता २०२६ पर्यंत मुदतवाढ मिळणे हा जनतेशी केलेला दगाफाटा असल्याचे शोभाताई फडणवीस यांचे मत आहे. या विरोधात येत्या २० आॅगस्टला ताडाळी टोल नाक्यासमोर बैठा सत्याग्रह करण्याचा आणि कुणालाही टोल न भरू देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या संदर्भात एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आपणाकडे वसुलीचा कसलाही हिशेब नसल्याचे ते सांगतात. याची देखरेख मुंबईच्या कार्यालयातून होते, असे त्यांचे म्हणणे आहे. ३२ कोटी रूपयांची टोल वसुली या नाक्यावरून करायची होती. प्रत्यक्षात आजवर २२५ कोटी रूपयांची वसुली झाल्याचा आरोप त्यांनी केला. २००४ ते २०१४ या काळात कंत्राटदाराने बोगस पावत्या देऊन नाका घेतल्याचाही गंभीर आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र या संदर्भात आपणास कसलीही माहिती नसल्याचे एमएसआरडीसीचे अधिकारी सांगतात. मात्र हा प्रकार त्यांच्याच संगनमातातून सुरू असल्याचा शोभातार्इंचा आरोप आहे. आपले आंदोलन टोल नाका बंद होईपर्यंत असेल, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला ट्रान्सपोर्ट व्यवसायी कुक्कु साहनी, सुरेश शर्मा, लायन्स क्लबचे शैलेश बागला, प्रकाश कोठारी, चंद्रपूर बचाव समितीचे डॉ. गोपाल मुंधडा, सुहास अलमस्त, आर्यएमएचे डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)