30% patients in the district are in Chandrapur taluka | जिल्ह्यामधील ३० टक्के रुग्ण चंद्रपूर तालुक्यात

जिल्ह्यामधील ३० टक्के रुग्ण चंद्रपूर तालुक्यात

ठळक मुद्देरुग्णाचा आलेख वाढताच : ब्रह्मपुरी तालुका ठरत आहे हॉटस्पॉट, ग्रामीण भागातही वाढले रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तोदेखील चंद्रपूरचाच. त्यानंतर चंद्रपूर तालुक्यात रुग्णाचा आलेख वाढतच राहिला. आजघडीला जिल्ह्यातील एकूण १२३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३७ रुग्ण म्हणजेच ३० टक्के रुग्ण चंद्रपूर तालुक्यातील आहेत. या तालुक्यापाठोपाठ ब्रह्मपुरी तालुकाही आता हॉटस्पाट ठरू लागला आहे. या तालुक्यात २१ रुग्ण आढळले आहेत.
कोरोना संसर्गामुळे २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन झाले. सहाजिकच चंद्रपूर जिल्हाही लॉकडाऊन झाला. मार्च, एप्रिल महिन्यापर्यंत चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्तच राहिला. मात्र त्यानंतर २ मे रोजी चंद्रपुरातील कृष्णनगर परिसरातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर जिल्ह्यात विशेषत चंद्रपुरात खळबळ उडाली. याच कालावधीत मजुरांचे जिल्ह्यात परत येणे सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण आढळून येणे सुरू झाले. असे असले तरी चंद्रपूर तालुक्यातील रुग्णांचा आलेख सातत्याने वाढतच राहिला. चंद्रपूर शहरासह तालुक्यातील दुर्गापूर, उर्जानगर, उर्जाग्राम, वरवट, आरवट, घुग्घुस या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारपर्यंत चंद्रपूर तालुक्यात एकूण ३७ रुग्णांची नोंद आहे. चंद्रपूरपाठोपाठ ब्रह्मपुरी तालुका रुग्णांबाबत संवेदनशिल ठरला आहे. या तालुक्यात सोमवारपर्यंत २१ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १२३ रुग्णांपैकी ३७ चंद्रपूर तालुका, २१ ब्रह्मपुरी तालुका तर उर्वरित ६५ रुग्ण इतर ग्रामीण भागातील आहेत.

सावली, जिवती कोरोनामुक्त तालुके
जिल्ह्यातील सावली, जिवती हे या दोन तालुक्यातील एकाही गावात अद्याप कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. या तालुक्यातदेखील बाहेर राज्यातून व जिल्ह्यात अनेक कामगारवर्ग परत आला आहे. मात्र त्यातील कुणालाही आतापर्यंत कोरोनाची लागण झालेली नाही. त्यामुळे हे तालुके सध्यातरी कोरोनामुक्त आहेत.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संशयितांचे व क्वारंटाईन असणाऱ्यांचे स्वॅब घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील ७६२ जणांचे अहवाल अद्यापही आरोग्य विभागाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे बाधितांचा आलेख आणखी वाढतच जाणार आहे.

दोन नवे रुग्ण
जिल्ह्यामध्ये सोमवारी सायंकाळी आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. नव्या दोन बाधितांमध्ये चंद्रपुरातील संस्थात्मक अलगीकरणात असणाºया भिवापूर वार्ड परिसरातील ३० वर्षीय महिलेचा समावेश आहे. हैदराबाद शहरातून ही महिला आली होती. दुसरा बाधित हा करंजी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहे. पोंभूर्णा तालुक्यातील मोहाळा येथील २१ वर्षीय हा तरुण संस्थात्मक अलगीकरणात होता.

Web Title: 30% patients in the district are in Chandrapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.