26th OBC Morcha: From Deekshabhoomi to Gandhi Chowk at Club Ground | 26 चा ओबीसी मोर्चा : दीक्षाभूमी ते गांधी चौक मार्गे क्लबग्राऊंडवर

26 चा ओबीसी मोर्चा : दीक्षाभूमी ते गांधी चौक मार्गे क्लबग्राऊंडवर

ठळक मुद्देओबीसी म्हणूनच व्हावे लागणार सहभागी : समन्वय समितीने केले स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ओबीसींचे हक्क,  जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी संविधान दिनी २६ नोव्हेंबर रोजी ओबीसींचा चंद्रपुरात विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विविध समित्या तसेच प्रत्येकांना जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, विविध पक्षातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकत्यांनी तसेच इतर पदाधिकाऱ्यांना आपले पद बाजूला सारून केवळ ओबीसी म्हणूनच सहभागी व्हावे लागणार आहे. यासंदर्भात समन्वय समितीने तशा स्पष्ट सूचना केल्या आहे. त्यामुळे राजकीय  किंवा इतर इच्छाशक्ती ठेवून मोर्चात सहभागी होणाऱ्यांवर  चाप बसणार आहे.
मोर्चानंतर ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ओबीसी समन्वय समितीचे  ॲड. पुरुषोत्तम सातपुते, ॲड. दत्ता हजारे, बळीराज धोटे, डाॅ. राकेश गावतुरे, प्रा. सूर्यकांत खनके, प्रा. विजय बदखल, प्रा. विजय मुसळे, ॲड. प्रशांत सोनुले आदींनी केले आहे.
५०० व्हाॅलेंटिअर्स तैनात
मोर्चामध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ५०० व्हाॅलेंटिअर्सची चमू राहणार आहे. त्यांना मोर्चातील शिस्तीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मास्क, सोशल डिस्टन्स, रांगेत चालण्यासाठी वेळोवेळी मोर्चेकऱ्यांना सांगण्याची जबाबदारी  त्यांना देण्यात आली आहे. मोर्चादरम्यान, कचरा होऊ न देता स्वच्छता पाळण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
असा असेल मार्ग
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर काॅलेज दीक्षाभूमी चंद्रपूर येथून ६ -६ च्या रांगेत मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा रामनगर, जटपुरा गेट ते जयंत टाॅकीज- गांधी चौकातून डावीकडे वळण घेत सराफा लाईन मार्गे कस्तुरबा चौक येईल. तेथून डावीकडे वळण घेत  जटपुरा गेट मार्गे  प्रियदर्शीनी चौकातून चांदा क्लब ग्राऊंडवर जातील. यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे.

वाहन पार्किंगची अशी आहे व्यवस्था
मूल व दुर्गापूर रोडकडील वाहने - लाॅ काॅलेज समोरील व विद्याविहार काॅन्व्हेंट मागील प्रशस्त मैदानात ठेवण्यात येईल. 
बल्लारपूर बायपास मार्गे येणारी वाहने - लाॅ काॅलेज व विद्याविहार काॅन्व्हेंट मागील मैदानात
बल्लारपूर रोड, महाकाली मंदिराकडून येणारी वाहने-कोहिनूर ग्राऊंड,महाकाली मंदिर परिसरातील मनपा मैदान,
पठाणपुरा रोडमार्गे येणारी वाहने -कोहिनूर ग्राऊंड
नागपूर रोड मार्गे येणारी वाहने विद्या निकेतन शाळा, गौरव सेलिब्रेशन लाॅन, लोकमान्य टिळक विद्यालय स्टेडियम जवळ, सेंट मायकेल स्कूल मैदान, चांदा पब्लिक स्कूल, इंदिरा गार्डन स्कूल, सिंधी काॅलनी, दांडिया मैदान, पिक प्लॅनेट बाजूचे मैदान येथे थांबविण्यात येणार आहे.
 

Web Title: 26th OBC Morcha: From Deekshabhoomi to Gandhi Chowk at Club Ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.