26 ग्रा. पं. पोटनिवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांची शक्ती पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST2021-12-17T05:00:00+5:302021-12-17T05:00:44+5:30

लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३५ (सी) अन्वये जिल्हा प्रशासनाने निवडणूक क्षेत्रात मतदान व मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर केला. निवडणूक असलेल्या क्षेत्रात मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली. या कालावधीत सर्व मद्य, बीअर, ताडी विक्री बंद ठेवून कोरडा दिवस पाळण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जारी केले

26g Pt. The power of local leaders for by-elections has waned | 26 ग्रा. पं. पोटनिवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांची शक्ती पणाला

26 ग्रा. पं. पोटनिवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांची शक्ती पणाला

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील सर्वच भागांत गत आठवड्यापासून थंडी  कमालीची वाढली असताना २६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक प्रचारामुळे स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. ग्रामपंचायतीवर आपल्याच समर्थकांचे वर्चस्व राहावे, यासाठी विविध राजकीय पक्षांचे गावातील नेते आपली ताकद पणाला लावल्याचे दिसून येत आहे. येत्या मंगळवारी (दि.२१) मतदान होणार असल्याने तालुक्यातील नेत्यांनीही  आता या गावांमध्ये भेटी देण्याचा सपाटा सुरू केल्याचे चित्र आहे.
गोंडपिपरी, वरोरा, बल्लारपूर, कोरपना, चिमूर, राजुरा, मूल, ब्रह्मपुरी, जिवती व नागभीड तालुक्यातील  २६ ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने निवडणूक विभागाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, नामनिर्देशनपासून तर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. मंगळवारी (दि.२१) मतदान झाल्यानंतर बुधवारी २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी केली जाणार आहे. 
या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा थेट सहभाग नसतो. मात्र, विविध राजकीय पक्षांचे समर्थक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायतीला मोठे महत्त्व प्राप्त झाले. नेतृत्व घडविण्याची प्रयोगशाळा म्हणूनही ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. 
ग्रामपंचायतची निवडणूक स्थानिक प्रश्नांवर लढविली जाते. राज्य व राष्ट्रीय प्रश्नांशी थेट संबंध नसतो. परंतु, ग्रामपंचायतमध्ये मिळालेल्या सत्तेवरूनच पुढे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे राजकीय समीकरण तयार होते.

या गावांमध्ये होणार पोटनिवडणूक

गोंडपिपरी तालुक्यातील परसोडी, कुडेसावली व विहीरगाव, वरोरा तालुक्यातील सोनेगाव, बोरगाव मो., खापरी, बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली, कोरपना तालुक्यातील अंतरगाव, चिमूर तालुक्यातील पिंपळगाव, येरखेडा, भद्रावती तालुक्यातील बिजोनी, राजुरा तालुक्यातील रामपूर, सिंधी, सुमठाणा, विरूर स्टेशन व सास्ती, मूल तालुक्यातील चिरोली, ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी, कोसंबी खडसमारा, खरकाडा व मेंडकी, जिवती तालुक्यातील लांबोरी व नंदप्पा, नागभीड तालुक्यातील येनोली माल, कोथुळना व सोनोली बुज या ग्रामपंचायतीमध्ये २१ डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.

नगरपंचायतींमध्येही धामधूम आणि धास्ती
सावली, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही या नगरपंचायतींची सार्वत्रिक आणि नागभीड नगरपरिषद पोटनिवडणुकीची सार्वत्रिक निवडणूकही मंगळवारी, २१ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे. निवडणूक प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी केली. मात्र, ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी राजकीय पक्ष व ओबीसी संघटनांकडून केली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारकडूनही याबाबत हालचाली सुरू झाल्याने उमेदवारांमध्ये धास्ती आहे.

निवडणूक क्षेत्रात मतदानदिनी ड्राय डे 
- लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३५ (सी) अन्वये जिल्हा प्रशासनाने निवडणूक क्षेत्रात मतदान व मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर केला. निवडणूक असलेल्या क्षेत्रात मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली. या कालावधीत सर्व मद्य, बीअर, ताडी विक्री बंद ठेवून कोरडा दिवस पाळण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जारी केले

 

Web Title: 26g Pt. The power of local leaders for by-elections has waned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.