संवेदनशील क्षेत्रावर १४ कॅमेऱ्यांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:01:11+5:30

तुकूम येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू आणि त्या पाठोपाठ घडलेल्या तीन चार वन्यप्राण्यांच्या हिंसक घटनांनी वन विभाग चांगलेच सतर्क झाले असून वन विभागाने संपूर्ण वनपरिक्षेत्रात गस्त वाढविली आहे.

14 cameras look at sensitive area | संवेदनशील क्षेत्रावर १४ कॅमेऱ्यांची नजर

संवेदनशील क्षेत्रावर १४ कॅमेऱ्यांची नजर

ठळक मुद्देवन्यप्राण्यांच्या हिंसक कारवाया वाढल्या : वाघाच्या हल्ल्यांमुळे गावकरी भयभीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : नागभीड वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांनी गत पंधरवाड्यात सतत केलेल्या काही हिंसक कारवायांनी चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ज्या भागात या घटना घडल्या, त्या संवेदनशील भागात १४ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय गस्तीच्या माध्यमातून १५ अधिकारी कर्मचारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
तुकूम येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू आणि त्या पाठोपाठ घडलेल्या तीन चार वन्यप्राण्यांच्या हिंसक घटनांनी वन विभाग चांगलेच सतर्क झाले असून वन विभागाने संपूर्ण वनपरिक्षेत्रात गस्त वाढविली आहे.
१८ जून रोजी तुकूम येथील एक शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता. त्यानंतर दोन तीन दिवसांनी बाम्हणी येथे एक वाघ चक्क घरात घुसला होता.
या वृत्ताची शाई वाळत नाही तोच नवखळा येथे रानडुकराने गावात येऊन तीन गावकऱ्यांना जखमी केले. एवढेच नाही तर नवखळा आणि चिंधी माल याठिकाणीही वाघाच्या हल्ल्यात जनावरे ठार झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाने परिक्षेत्रातील सर्व क्षेत्र सहाय्यकांना सतर्कतेबरोबरच आपआपल्या क्षेत्रात गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागभीड वनपरिक्षेत्रात नागभीड, डोंगरगाव आणि मिंडाळा हे तीन क्षेत्र असून या क्षेत्रातील वनरक्षक, अधिसंख्य वनमजूर, बारमाही मजूर यांच्या चमू तयार करून गस्त घालावी, असे या पत्रात वनपरिक्षेत्राधिकाऱ्यानी म्हटले आहे.
ही गस्त सकाळी ८ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भोजन व विसावा यासाठी या कर्मचाऱ्यांना मधल्या काळात दोन तासांची सूट देण्यात आली आहे.
२६ तारखेपासून ही गस्त सुरू असून २ क्षेत्र सहाय्यक, ९ वनरक्षक, ५ वनमजूर या गस्तीमध्ये सहभागी आहेत. वनपरिक्षेत्राधिकारी महेश गायकवाड संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लवकरच वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात येणार, असे वनविभाग म्हणत आहे.

 

Web Title: 14 cameras look at sensitive area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल