चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायत निवडणुकीतील पाच हजार १५९ जागांसाठी तब्बल १२ हजार ६७७ उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत छाननीचे काम सुरू राहणार आहे. त्यानंतर छाननीत जिल्ह्यात एकूण किती उमेदवारांचे अर्ज बाद होतात, हे कळू शकणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे. त्यानंतर तीन दिवस शासकीय सुटी असल्याने मागील आठवड्यात हे काम थांबले होते. त्यानंतर उमेदवारांची नामांकन दाखल करण्यासाठी एकच गर्दी उसळली. जिल्ह्यात ६२९ ग्रामपंचायतींच्या एक हजार १८१ प्रभागातून पाच हजार १५९ सदस्य निवडून द्यायचे आहेत. यासाठी दोन हजार १२८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या निवडणुकांसाठी जिल्हाभरातील एक लाख ३५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कोरोना संसर्गामुळे यावर्षी ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या सूचना निवडणूक विभागाने दिल्या. मात्र अनेकदा लिंक जुळत असल्याने नामांकन अर्ज सादर करताना अडचणी निर्माण होत होत्या. याबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर मंगळवारी म्हणजे अखेरच्या दिवशी नामांकन अर्ज ऑफलाईन सादर करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांची अर्ज सादर करण्यासाठी अचानक गर्दी उसळली. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल नऊ हजार ६९० उमेदवारांनी आपले नामांकन सादर केले. सोमवारपर्यंत एकूण दोन हजार ९८७ नामांकन दाखल झाले होते.
बॉक्स
गावांमध्ये निवडणुकीच्याच चर्चा
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक उमेदवारांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र असे करताना त्यांना कोरोना नियमांचेही पालन करावे लागणार आहे. गावांमधील चौकाचौकात, रात्री शेकोटी पेटवून बसलेले असताना निवडणुकीच्याच चर्चा रंगताना दिसत आहे.
बॉक्स
एकाच दिवशी आलेले ९,६९० अर्ज
राजुरा-३६१
कोरपना-२३८
जिवती-७
गोंडपिपरी-५८८
चंद्रपूर-९६८
मूल-६२६
पोंभुर्णा-३७३
बल्लारपूर-१७८
ब्रह्मपुरी-९९०
सिंदेवाही-९१७
सावली-७४१
चिमूर-१२०८
नागभीड-६०१
वरोरा-१०५२
भद्रावती-८४२
एकूण-९,६९०