नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 07:47 IST2025-12-27T07:47:37+5:302025-12-27T07:47:49+5:30
कोविडनंतर जगात अनेक ठिकाणी चित्र पूर्णपणे बदललंय. बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं, अनेक कंपन्या कमीत कमी कर्मचाऱ्यांकडून ...

नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
कोविडनंतर जगात अनेक ठिकाणी चित्र पूर्णपणे बदललंय. बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं, अनेक कंपन्या कमीत कमी कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त काम काढून घेताहेत, कर्मचाऱ्यांना ‘पर्याय’ नसल्यानं तेही मान मोडून काम करताहेत, अन्याय सहन करताहेत; पण दुसरीकडे काही क्षेत्रं अशीही आहेत, जिथे कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत. जे आहेत ते काही महिने काम करून लगेच काम सोडताहेत. दुसरीकडे काम शोधतात. कारण त्यांच्यासाठी इतर कंपन्या पायघड्या टाकून बसलेल्याच आहेत. जास्त पगारावर आणि प्रमोशनवर इतर कंपन्यांचे कर्मचारी ते आपल्याकडे ओढताहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांपुढे मोठी बिकट परिस्थिती ओढवली आहे.
चीनमधील काही कंपन्यांनी आपले कर्मचारी जॉब साेडून जाऊ नयेत म्हणून आता वेगवेगळ्या आयडिया लढवायला सुरुवात केली आहे. त्यांना आमिषं दाखवायला सुरुवात केली आहे. त्यातलची एक कंपनी आहे झेजिआंग गोशेंग ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी.
कर्मचारी आपल्याकडे टिकावेत, जाॅब साेडून जाऊ नयेत यासाठी या कंपनीनं काय करावं? कंपनीत जे कर्मचारी पाच वर्षे पूर्ण करतील त्यांना कंपनी चक्क एक शानदार फ्लॅट मोफत देणार आहे. त्यासाठी कंपनीनं १८ फ्लॅट निवडले असून, ते पुढील तीन वर्षांत दिले जाणार आहेत. कंपनीतील एका दाम्पत्याला नुकताच एक आलिशान फ्लॅट देण्यात आलाय. शिवाय या फ्लॅटचं वैशिष्ट्य म्हणजे हे फ्लॅट कंपनीपासून जास्तीत जास्त फक्त पाच किलोमीटरच्या परिसरात असतील आणि त्यांचं क्षेत्रफळ सुमारे १७०० चौरस फूट असेल!
यासंदर्भात कंपनीनं जॉब लिस्टिंग पोस्टही शेअर केली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांची मेहनत आणि त्यांच्या निष्ठेचं फळ म्हणून कंपनी त्यांना हे बक्षीस देणार आहे. या कर्मचाऱ्यांना कंपनी केवळ फ्लॅटच देणार नाही, तर ते वेल फर्निश्ड असतील. कर्मचाऱ्यांना एकही वस्तू नव्यानं विकत आणण्याची गरज आहे. त्यांनी रिकाम्या हातानं तिथे यायचं आणि थेट राहायला सुरुवात करायची!
कर्मचाऱ्यांनीही या योजनेचं स्वागत केलं आहे. जे कर्मचारी कंपनी सोडून जाणार होते, त्यांनीही या योजनेमुळे आपला बेत तूर्त स्थगित केला आहे. ज्यांना राहण्यासाठी घरं मिळतील त्यांच्या कंपनीची अट फक्त एवढीच आहे की, त्यानी कंपनीत ५ वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी. त्यानंतर घर त्यांच्या नावावर केलं जाईल. कर्मचाऱ्यांना एक हाउसिंग ॲग्रिमेंट साइन करावं लागेल आणि कंपनीकडून रिनोव्हेशन पूर्ण झाल्यानंतर ते त्या घरात राहू शकतील. कंपनीचं म्हणणं आहे, या भेटवस्तूंच्या मागचा उद्देश ऑपरेशनल खर्च कमी करणं आणि क्वालिटी मॅनेजमेंट अधिक चांगलं करणं हा आहे.
अर्थात कंपनी आपल्या ‘निष्ठावान’ कर्मचाऱ्यांना फ्लॅटची ही महागडी भेट देत असली, तरी त्यांनी पुढे किती वर्षे सेवा द्यावी, याबाबतचा काही नियम किंवा अट आहे का, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. चीनच्या वेनझोउ शहरातील ही कंपनी ऑटोमोटिव्ह फास्टनर प्रॉडक्ट्समधील नामांकित कंपनी आहे. या कंपनीत ४५० हून अधिक कर्मचारी आहेत आणि कोट्यवधी युआनची त्यांची उलाढाल आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी घरांची भेट फायदेशीर ठरू शकते.