दहावीनंतर सायन्स घेतलं, पण आता झेपत नाही!-काय करायचं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 15:52 IST2017-08-02T15:47:19+5:302017-08-02T15:52:13+5:30
दहावीत भरपूर मार्क पडले म्हणून काहीजण सायन्स घेतात पण पुढे जमत नाही म्हणून सोडून द्यायचं म्हणतात, पण सोडण्याच्या आधी काही गोष्टी तपासून पहा.

दहावीनंतर सायन्स घेतलं, पण आता झेपत नाही!-काय करायचं?
-श्रुती पानसे
दहावीनंतर सायन्स घेतलं, आता दुसर्या शाखेकडे जावंसं वाटतं आहे. दहावीला चांगले मार्क मिळाले, सायन्सला सहज प्रवेश मिळाला. म्हणून सायन्स घेतलं. पण आता लक्षात आलं की, ही साईड आपल्यासाठी नाही. इथे शिकवल्या जाणार्या विषयांमध्ये आपल्याला काडीचाही रस नाही. असं अनेक मुलं सांगतात. तुमचंही असं काही होतंय का? मित्रांनी घेतलं म्हणून, घरचे म्हणाले म्हणून, स्कोप आहे म्हणून किंवा दहावीला भरपूर मार्क मिळाले म्हणून तुम्ही सायन्स घेतलं आणि आता ते झेपत नाही, सोडून द्यावंसं वाटतं का?
वास्तविक शाळेत असतानाही सायन्स आवडतं, असं काही नसतं. पण अचानक जास्त मार्कपडतात, ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’, शाळेने दिलेले अंतर्गत गुण, वर्षभराच्या अभ्यासाला असलेले गुण किंवा कला, क्र ीडा यात भाग घेतल्यामुळे वाढलेले गुण यामुळे हे मार्क ‘वाढल्या’सारखे वाटतात. हे वाढलेले मार्क सायन्सकडे जाण्याला उद्युक्त करतात. शिवाय आपल्याकडे उगाचच सायन्सला एक वलय आहे. सायन्सला जाणार्यांची कॉलर ताठ असते. केवळ म्हणून अनेकजण सायन्स कडे जातात.
बारावीपर्यंत सायन्स केलं तर पुढे अनेक शाखांचे पर्याय उभे राहतात अशा काही कारणांमुळे मुलं- मुली सायन्सला जातात. आपण याच टप्प्यावर सावध होण्याची गरज आहे. आपल्याला नक्की काय हवंय, काय आवडतं हे बघायला पाहिजे. ज्यांनी अकरावी- बारावी सायन्स केलंय, अशांची वह्या-पुस्तकं बघा, सिलॅबस समजून घ्या. अकरावीच्या पुढचा कोणताच अभ्यासक्र म सोपा नसतो. कुठेही गेलं तरी कष्ट करण्याची तयारी हवीच.
ज्यांना सायन्स घेतलं आहे आणि आता ते सोडायचं आहे, त्यांनीही कष्टाची तयारी ठेवा. ‘आपल्याला जमेल’ असा विश्वास ठेवा. अकरावीला सायन्स सोडू नका. निदान बारावी करा. जितके मार्क मिळतील, त्या आधारे पुन्हा प्रयत्न करता येतील. बारावीनंतर आर्ट्सला येऊन आपल्या आवडीचे विषय घेऊन उत्तम करिअर करणारे अनेक आहेत.
त्यामुळे सायन्स सोडण्याच्या निर्णयापुर्वी या काही गोष्टी लक्षात ठेवा.
1) जे करताय ते आवडत नाही?
आजकाल शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध असल्यामुळे नक्की कोणत्या शाखेकडे जायचं आहे, याचा निर्णय घेणं अवघड जातं. गोंधळ उडतो. आपल्याला सल्ला देणारे आईवडील, करिअर कौन्सेलर, मोठी भावंडं, त्यांचं मित्रमंडळ हे सगळे जण वेगवेगळ्या सूचना देत असतात. त्यापैकी आपल्याला त्यातलं फारसं काही कळत नसल्यामुळे निर्णय घेणं अवघड जातं. अखेर एका टप्प्यावर आपण एक शाखा निवडतो आणि त्यामागे जातो. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला दुसरंच काहीतरी करायचं होतं, असा साक्षात्कार होतो.
अशावेळी काही गोष्टी कठोरपणे तपासून बघा.
जी शाखा निवडली आहे, त्यात चांगले मार्क मिळण्यासाठी प्रयत्न कमी पडताहेत का?
आकलन आणि अभ्यास अजून हवा आहे का?
जी शाखा आता नव्याने निवडावीशी वाटते आहे, ती नेमकी कशामुळे? अभ्यास कमी असतो, मित्नाने / मैत्रिणीने निवडली आहे म्हणून की अजून काही?
त्या शाखेकडे पुढे जाऊन करिअरच्या व्यापक संधी निश्चितपणे उपलब्ध होऊ शकतात का?
याचा विचार करा. नाहीतर आधीचाच अभ्यासक्र म बरा होता, असं म्हणण्याची वेळ येऊ नये. ‘हातचं सोडून पळत्याच्या मागे’ ही म्हण लक्षात ठेवा.
मराठी की इंग्रजी माध्यम
दहावी - बारावीपर्यंत मराठी माध्यमात शिक्षण झालं असेल तर पुढे कोणतं माध्यम घ्यायचं हा प्रश्न निर्माण होतो. शिक्षणासाठी कोणतं माध्यम निवडायचं यापेक्षाही अजून पाच- सहा वर्षांनी जो काही नोकरी - व्यवसाय म्हणून स्वीकारणार आहात, तिथे कोणत्या भाषेत व्यवहार चालतो, याचा विचार करा. तिथे मराठी चालणार असेल, उच्च मराठी, इतर भारतीय भाषा -भगिनींमध्ये काम असं असेल तर माध्यम बदलण्याची गरज नाही. मात्न नोकरी - व्यवसायातले सर्व व्यवहार इंग्रजीतून होणार असतील. तर आत्ताच इंग्रजी माध्यम निवडलेलं चांगलं. या वर्षात तुम्हाला इंग्रजीवर प्रभुत्व मिळवता येईल.
सध्याचा काळ हा बहुभाषिकांचा आहे. यापुढील काळात ज्यांना मराठी - हिंदी- इंग्रजीसह इतरही काही भाषा येतात त्यांना जास्त चांगले पर्याय खुले असतील, त्यामुळे अन्य भाषेत शिकण्याला प्राधान्य द्यायला हवं. आपण स्वतर्साठी नेहमीच ‘कम्फर्ट’ शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तसं नको. त्यापेक्षा आत्ता मेहनत करा. तुमच्या वयात मेंदू उत्तम साथ देत असतो. सर्व काही शिकण्याची क्षमता असते, हे लक्षात घ्या.