Career opportunities for providing protection lessons | संरक्षणाचे धडे देण्यातही ‘करिअर’च्या संधी
संरक्षणाचे धडे देण्यातही ‘करिअर’च्या संधी

एखाद्या चित्रपटांत आपल्या आवडत्या हिरोने केलेली फायटिंग पहिली की, आपणही चार-पाच जणांना असेच एकाच फटक्यात पडावे, असे आपल्यापैकी बऱ्यांच जणांना वाटत असणार यात वाद नाही. मात्र, या फायटिंगमागे ही त्या-त्या कलाकारांची किंवा त्यांना प्रशिक्षण देणाºयांनी प्रचंड मेहनत असते. खरे तर स्वसंरक्षण आणि इतरांचे रक्षण करायला शिकविणे हेसुद्धा एक करिअर आहे, याचा कोणी फार विचार करीत नाही. मात्र, या क्षेत्राकडेही करिअर म्हणून पाहता येते. मार्शल आर्ट ही स्वसंरक्षणची एक कला असून, स्वत:च्या रक्षणासोबत इतरांचे रक्षण हा त्या कलेच्या उदयामागील हेतू आहे. प्रचंड एकाग्रता, धैर्य या कलेत पाहावयास मिळते. ही एक कला आणि विज्ञानही आहे. युरोप आशिया खंडातही या कलेविषयी प्रचंड आकर्षण असल्याचे पाहायला मिळते. देशभरात आता मार्शल आर्ट शिकण्याकडे तरुणाईचा वाढता कल आहे. या कलेत प्रावीण्य मिळविल्यास देश-विदेशातदेखील संधी उपलब्ध होऊ शकतात. सद्य:स्थितीत प्रशिक्षण देणाºया शासकीय संस्था नसल्याने, खाजगीरीत्या प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रयत्नपूर्वक कष्ट, कलेतील बारकावे, तसेच इतरांना सतत प्रेरित करण्याची तयारी आणि संयम असल्यास, या क्षेत्रात उज्ज्वल भविष्य निर्माण करता येईल.
>संधी : मार्शल आर्ट प्रशिक्षित उमेदवारास सुरक्षासंबंधी संस्थात काम करता येते. नामांकित व्यावसायिक कंपन्या आणि उच्चस्तरीय व्यक्तींच्या खासगी सुरक्षितेसाठी यांची गरज भासते. जिम किंवा फिटनेस सेंटरमध्ये प्रशिक्षक म्हणूनही काम करता येते. स्वत:ची प्रशिक्षण संस्था काढून व्यावसायिकरीत्या कार्यरत राहू शकता. चित्रपटात फाईट सिक्वेन्स र्द्श्यात त्यांना सामील करून घेतले जाते, तसेच पोलीस व लष्करी सेवेतदेखील हे प्रशिक्षण फायद्याचे ठरते. सध्या शहरात कराटे आणि तायक्वांदो प्रशिक्षण देणाºया अनेक संस्था कार्यरत आहेत, त्यात प्रशिक्षक म्हणून १५ हजार रुपये सुरुवातीस वेतन मिळू शकते. एकदा या क्षेत्रात नावलौकिक झाल्यास कामाच्या संधी वाढतात. मार्शल आर्टस प्रशिक्षण संस्थेची निवड करताना, ती काळजीपूर्वक करावी. प्रशिक्षक योग्यताप्राप्त आणि अनुभवी आहे का याची खात्री करावी, तसेच ती संस्था नोंदणीकृत आहे का हे तपासावे.
>पात्रता : मार्शल आर्ट शिकण्यासाठी प्रशिक्षणार्थीचे वय हे १० ते २५ दरम्यान असावे. शारीरिकदृष्ट्याही तो तंदुरुस्त असावा. ज्युडो कराटे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, लेखी परीक्षा पास झाल्यावर ब्लॅक बेल्ट दिला जातो. तिथपर्यंत पोहोचण्याचा कालावधी ३ ते ४ वर्षांचा असतो, तसेच उत्तम संवाद कौशल्यही या क्षेत्रात गरजेचे आहे. अवगत केलेले प्रशिक्षण तंत्र दुसºयास शिकविण्याची कलाही आत्मसात करावी लागते.
>मार्शल आर्टचे प्रकार
तायक्वांदो : या कलेचा जन्म कोरियात पाच हजार वर्षापूर्वी झालेला आहे. किक आणि पंच हे या कला प्रकारचे वैशिष्ट्य आहे. आॅलम्पिकमध्येही याचा समावेश केला गेला आहे.
जुसुत्सू : ही जपानमधील प्राचीन कला आहे. समुराई हा समूह हत्यार नसताना लढण्यासाठी या कलेचा वापर करायचे. या कलेत प्रतिद्वंद्वीच्या राग आणि आक्रमकतेचा वापर खुबीने करून घेतला जातो.
निन्जुत्सू : ही कला शिकणाºयास निंजा असे म्हटले जाते. अनेक चित्रपटात ही कला दाखविली जाते. जगातील सगळ्यात रहस्यमय असणारा हा प्रकार असून, जपानमध्ये ही कला प्रामुख्याने शिकली जाते. यात तलवार, छोटे चाकू आणि काही रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो.
विंग चुन : ही कला सतराव्या शतकात विकसित झाली आहे. बौद्ध भिक्षुणी नग मुई हिने या कलेचा विकास केला. पशु, पक्षी आणि पतंग यांच्याकडून प्रेरित होऊन ही कला विकसित केली गेली. आजकाल विंग चुनचे फायटर्स जगभरात आणि साहसी चित्रपटातून जास्त ओळखले जातात.
कराटे : भारतात हा सर्वात जास्त प्रकार शिकविला आणि आत्मसात केला जातो. ‘कराटे’ हा जपानी शब्द आहे. याचा अर्थ रिकामा हात असा होतो. यामध्ये हात आणि पाय याचा वापर तलवार आणि चाकू या हेतूने केला जातो. स्वयंरक्षणाचा हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे.
कुंग फू : हा एक चायनीज प्रकार आहे. या शब्दाचा अर्थ आपल्यापेक्षा शक्तिशाली व्यक्तीशी लढणे असा होतो. चीनमध्ये भारतीय राजकुमार बोधीधर्मन यांनी कलेचा विकास आणि प्रसार केला. भारतात मात्र या कलेचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही.
मुएय थाई : हा थायलंडचा राष्ट्रीय खेळ आहे. तो जगातील सर्वात महत्वाचा मार्शल कलेचा प्रकार आहे. आठ अंग असलेला हा मार्शल आर्ट प्रकार असून, हाताची मूठ, गुडघे, पाय
याचा वापर यात खुबीने केला जातो.
कराव मागा : जगातील सर्वश्रेष्ठ प्रकारांपैकी हा एक आहे. लमी लीचटेनफील्ड यांनी या कलेचा विकास केला. ते जगातील उत्कृष्ट रेसलर, बॉक्सर आणि जिम्नॅस्टिक्स होते. ‘कराव मागा’ या समुदायाच्या बचावासाठी या कलेचा वापर केला गेला. आता मागा मार्शल आर्ट इस्रायल पोलीस जास्त प्रमाणात वापरतात.
कलारी : कलारी हा प्रकार मार्शल आर्टचा जनक मानला जातो. चीन आणि जपान या देशात त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बोधीधर्मन यांनी ही कला चीनला दिली आणि त्यानंतर ती पुढे जपानला गेली.


Web Title: Career opportunities for providing protection lessons
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.