जि.प. शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव
By Admin | Updated: August 21, 2014 23:23 IST2014-08-21T23:23:56+5:302014-08-21T23:23:56+5:30
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

जि.प. शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव
सिंदखेडराजा : तालुक्यातील काही जि.प. शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
तालुक्यातील आडगावराजा येथे जि.प. उच्च प्राथमिक केंद्रीय शाळा आहे. त्यामध्ये पहिली ते सातवीपर्यंत १0३ मुली व १00 मुले शिक्षण घेत असून, त्यासाठी ७ शिक्षक कार्यरत आहेत. शाळेला ५ संगणक असून, ते विद्युतअभावी धूळ खात पडलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या संगणकाचा काहीही फायदा होत नाही. तसेच मुलींसाठी येथे शौचालय आहे. परंतु सदर शौचालय हे कायमचे बंद असल्याची माहिती आहे. शालेय पोषण आहारातही शासनाने ठरवून दिलेल्या विविध जीवनसत्वयुक्त अन्नघटकांचा वापर होत नाही. त्यामुळे येथील खिचडी चविष्ट होत नसल्याने विद्यार्थी पोषण आहार घेण्याचे टाळतात. तसेच या शाळेमध्ये भौतिक सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
आडगावराजा येथेच जिजामाता विद्यालय असून, ८ वी ते १0 वी पर्यंत वर्ग आहेत. त्यामध्ये ५६ विद्यार्थी व ५८ विद्यार्थी शिक्षण घेत असून, पाच शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेतही शैक्षणिक सुविधांचा व विविध मूलभूत सुविधांचा बोजवारा होत आहे. येथे विद्यार्थिनींकरिता शौचालय असून, ते बंदच आहे. विद्यार्थ्यांंना माहिती संप्रेषण हा ५0 गुणांचा विषय असून, तो विद्यालयामध्ये संगणक नसल्यामुळे शिकविला जात नसल्याची माहिती आहे. विद्यालयातील प्रयोगशाळेतील साहित्यही अडगळीत पडलेले आहे. शासन ग्रामीण विद्यार्थ्यांंना भौतिक सुविधा देण्याच्या माध्यमातून प्रयत्न करीत असतानाही प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांंना याचा कोठेही फायदा होत नसल्याची परिस्थिती आहे.