कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांनी जायचे कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:31 IST2021-04-26T04:31:35+5:302021-04-26T04:31:35+5:30

शासकीयच नव्हे, तर अनेक खासगी रुग्णालयांतील खाटाही कोरोनासाठी राखीव केल्या गेल्या आहेत. त्यात हृदयरोग विभाग, एमआयसीयू हे विभाग सध्या ...

Where do emergency patients without corona go? | कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांनी जायचे कोठे?

कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांनी जायचे कोठे?

शासकीयच नव्हे, तर अनेक खासगी रुग्णालयांतील खाटाही कोरोनासाठी राखीव केल्या गेल्या आहेत. त्यात हृदयरोग विभाग, एमआयसीयू हे विभाग सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. प्रमुख खासगी रुग्णालयांतही कोरोनावर भर असल्याने कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात हृदयरोगासंबंधीच्या शासकीय उपचाराची सुविधा केवळ मोजक्याच ठिकाणी आहे. अनेक सुपरस्पेशालिटी इमारतीतही कोविडसाठी राखीव झाल्याने हृदयरोग तज्ज्ञांना केवळ ओपीडी सुविधाच उपलब्ध होत आहे. मोठ्या रुग्णालयात जनआरोग्य योजनांतून सुविधा आहेत. मात्र, कोरोनामुळे लोक अंगावर दुखणे काढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर कोरोना निगेटिव्ह पण एचआरसीटी स्कोर वाढलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी बेडची शोधाशोध करावी लागत आहे. कारण बहुतांश व्हेंटिलेटर हे कोविड उपचारात, तर मोजकेच व्हेंटिलेटर नॉनकोविड उपचारासाठी उपलब्ध आहेत.

७० रुग्णालयांत कोविडचे उपचार

जिल्ह्यात विविध आजारांवर अद्ययावत वैद्यकीय सेवा देणाऱ्या बहुतांश रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यातील शासकीय व खासगी अशा एकूण ७० रुग्णालयांमध्ये कोविडचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे मोजक्याच रुग्णालयांत कोरोना वगळता इतर रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, कोरोनामुळे इतर रुग्ण विभागातही उपचार घेताना रुग्ण, नातेवाइकांमध्ये भीती असल्याचे दिसून येते.

रोज दहापेक्षा अधिक रुग्ण परत

शहरातील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी आल्यानंतर त्या रुग्णालयात कोविडचेसुद्धा रुग्ण आहेत, अशी माहिती मिळताच काही रुग्ण त्या खासगी रुग्णालयातून काढता पाय घेतात. त्यामुळे नॉन कोविड असलेले दहापेक्षा अधिक रुग्ण दिवसाला परत जात आहेत.

रुग्णांची गैरसोय

आरोग्य विभागाचे सर्व लक्ष सध्या कोविड रुग्णांवर आहे. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांची सध्या गैरसाेय होत आहे. काही नामांकित खासगी रुग्णालयांनी तर नॉन कोविड सेवा बंद करून तेथे केवळ कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना निगेटिव्ह, पण न्यूमोनिया आणि तत्सम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक आहे.

बुलडाणा शहरातील शासकीय रुग्णालय

बुलडाणा शहरातील शासकीय कोविड रुग्णालय

२००

नॉन कोविडचे उपलब्ध बेड

७०

कोविड उपचार सुरू असलेले

शासकीय व खासगी रुग्णालये

७२९१

कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण

Web Title: Where do emergency patients without corona go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.