पाणथळ प्रगणना निसर्ग अनुभव कार्यक्रम स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 18:25 IST2020-04-25T17:37:48+5:302020-04-25T18:25:05+5:30
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षणक यांनी हा निर्णय घेतला आहे.

पाणथळ प्रगणना निसर्ग अनुभव कार्यक्रम स्थगित
बुलडाणा: बुद्ध पोर्णिमेदरम्यान राज्यातील वनामध्ये सात आणि आठ मे दरम्यान राबविण्यात येणाºया पाणथळ प्रगणना निसर्गअनुभव कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. पाणथळ जागी उभारण्यात येणाºया मचानीवर सोशल डिस्टंन्सींगचे पालन होण्याची शक्यता नसल्याने तथा या उपक्रमात सहभागी निसर्गप्रेमींची संख्या पाहता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षणक यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील वनामध्ये यंदा हा कार्यक्रम स्थगित ठेवण्यात आला आहे.
यासंदर्भात मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व बोर व्याघ्र प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासह, नाशीक येथील वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक तथा पुणे, ठाणे येथील वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षकांसह प्रादेशिख मुख्य वनसंरक्षकांना २३ एप्रिल रोजीच प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून अनुषंगीक विषयान्वये एक पत्र पाठविण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या संदर्भानेच यापूर्वीच १८ मार्च रोजी राज्यातील अभयारण्यालगतच्या क्षेत्राताली गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला होता. बुलडाणा येथील ज्ञानगंगा अभयारण्यातही देहरादून येथील वन्यजीव संस्थेचे बिलाल हबीब हे वाघांच्या अधिवासाच्या दृष्टीने ज्ञानगंगा अभयारण्य कितपत उपयुक्त आहे, याच्या अभ्यासाच्या दृष्टीने येणार होते. त्यांचाही हा २८ मार्च रोजीचा दौरा रद्द करण्यात आला होता. आता त्यानंतर ७ आणि ८ मे रोजीच्या पाणथळ प्रगणना निसर्ग अनुभव कार्यक्रम स्थगित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ वन्यजीव विभागाचे, प्रादेशिक वनविभागाचेच कर्मचारी अनुषंगीक कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संकेत बुलडाणा येथील वन्यजीव विभागातील सुत्रांनी दिले आहेत.
दुरवरून येतात पर्यटक
या पाणथळ प्रगणना निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यात बेंगलुरू, बडोदा, मुंबई, कलकत्त्यासह विविध ठिकाणाहून स्वयंसेवक व निसर्गप्रेमी येतात. पाणथळाच्या लगत उभारण्यात आलेल्या मचाणीवर त्यांची बसण्याची व्यवस्था केल्यास तेथे सामाजिक अंतर राखणे अवघड होणार आहे. त्यातून प्रसंगी कोरोना संसर्गाची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.