वाशिम जिल्ह्यात दीड महिन्यांतच पावसाची सरासरी ६० टक्क्यांच्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 14:40 IST2018-07-21T14:38:41+5:302018-07-21T14:40:08+5:30
वाशिम: गतवर्षी पाणीटंचाईने होरपळलेल्या वाशिम जिल्ह्यात यंदा पावसाने बस्तानच मांडले आहे. अवघ्या ५० दिवसांच्या कालावधित जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६०.१२ टक्के पाऊस पडला आहे.

वाशिम जिल्ह्यात दीड महिन्यांतच पावसाची सरासरी ६० टक्क्यांच्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गतवर्षी पाणीटंचाईने होरपळलेल्या वाशिम जिल्ह्यात यंदा पावसाने बस्तानच मांडले आहे. अवघ्या ५० दिवसांच्या कालावधित जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६०.१२ टक्के पाऊस पडला आहे. अतिपावसामुळे पिके संकटात सापडत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. दुसरीकडे पावसाची सरासरी वाढल्याने जलस्त्रोतांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
वाशिम जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ८४ टक्के पाऊस पडला होता. त्यामुळे हिवाळ्यापासूनच जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली, पीक उत्पादनात घट आली. आता जूनच्या सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण चांगले असल्याने खरीपाची पेरणी उरकत आली; परंतु आता ही पिके जोम धरत असताना पावसाने रिपरिप लावली आहे. जिल्ह्यात १ जून ते २१ जुलैदरम्यान सरासरी ३८० मिमी. पाऊस अपेक्षीत असताना याच कालावधित यंदा ४८० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. आता या पावसामुळे जोम धरू लागलेली पिके पिवळी पडत चालली आहेत. शेतकºयांना आंतरगत मशागतीसाठी वेळही मिळेनासा झाला असून, याच पावसामुळे खत टाकणेही अवघड होऊन बसले आहे. जिल्ह्यात खरीपाची पेरणी ९९ टक्क्यांहून अधिक झाली आहे. यातील निम्मी पेरणी ही जूनच्या अखेरपासून सुरू करण्यात आली होती. त्यामुळे या पिकांची स्थिती सततच्या पावसामुळे अधिकच गंभीर झाली आहे.