धामणगाव बढे: गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातूनच गावाची वाटचाल समृद्धीकडे होईल, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे मुख्य सल्लागार डॉ. अविनाश पोळ यांनी केले. मोताळा तालुक्यातील सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी गाव दाभा येथे भेट दिली असता ते बोलत होते़ यावेळी त्यांनी दाभा गावाची समृद्ध गाव स्पर्धेतील वाटचाल व गावांनी केलेली कामाची पाहणी केली.
दाभा गावातील नरेगा अंतर्गत शोषखड्डे, निर्मिती वृक्षलागवड, धरणातील गाळ काढणे, वैयक्तिक शेतकऱ्यांनी केलेली फळबागांची त्यांनी पाहणी केली. यामध्ये समृद्ध गाव स्पर्धेची सहा स्तंभं, स्पर्धेची पुढील वाटचाल व गावाने पुढील कालावधीत करावयाच्या कामाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. गाव समृद्ध करायचे असेल, तर गावातील एक-दोन लोकांनी प्रयत्न करून होणार नाही. समृद्धीकरिता गावाने सामूहिक प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे, गावाच्या समृद्धीबरोबरच गावाच्या आरोग्य, शिक्षण, रोजगार याबाबतसुद्धा एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी पंचायत समिती मोताळाचे गटविकास अधिकारी मोहोड व नरेगा विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. अविनाश पोळ यांनी दाभा गाव समृद्ध गाव स्पर्धेमध्ये सध्या करीत असलेल्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. नरेगा योजना गावातील प्रत्येक व्यक्तीसाठी किती उपयुक्त आहे आणि त्यामधून आपण कोणती कामे करू शकतो, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावच्या सरपंच सरला रवींद्र हागे, सर्व ग्रा. पं. सदस्य आणि युवकवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
विविध कामांची पाहणी
दाभा गावातील तरुण मंडळी, युवक वर्ग चांगल्या प्रकारे काम करत असून अविनाश पोळ यांनी गावाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतीमार्फत रोजगार हमी योजनेतून गावामध्ये सांडपाणी निर्मूलनासाठी तयार केलेल्या शोषखड्ड्यांची पाहणी केली. गावातील प्रयोगशील शेतकरी बळीराम होनाळे यांनी आपल्या शेतामध्ये रोजगार हमी योजनेतून लिंबू लागवड व शेवगा लागवड केलेल्या पिकांची पाहणी केली. बळीराम होनाळे करीत असलेल्या नावीन्यपूर्ण शेतीबद्दल आशावाद व्यक्त केला.