कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालेल्या कुटुंबावर गावकऱ्यांचा जीवनावश्यक वस्तु देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 10:56 IST2021-04-25T10:52:13+5:302021-04-25T10:56:03+5:30

Boycott by villagers : या कुटुंबावर दुहेरी आघात सहन करण्याची वेळ आली आहे. 

Unannounced boycott of the village on the family of the two who died due to corona | कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालेल्या कुटुंबावर गावकऱ्यांचा जीवनावश्यक वस्तु देण्यास नकार

कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झालेल्या कुटुंबावर गावकऱ्यांचा जीवनावश्यक वस्तु देण्यास नकार

ठळक मुद्देएका दिवसाच्या अंतराने दोघांचाही काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला.दोन महिला व दोन मुलांनी बोथा काजी गावातील घरी दु:खात दिवस काढणे सुरू केले. जीवनावश्यक गरजा भागविणाऱ्यांनी त्यांना नकार देण्यास सुरुवात केली.

लोकमत न्यूज नेटवर्क   
खामगाव : कुटुंब प्रमुखासह वडिलांचा दोन दिवसांत मृत्यू झाल्याने त्या कुटुंबातील इतर सदस्यांना जीवनावश्यक वस्तू देण्यास व्यावसायिकांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार घडत आहे. संबंधितांनी ही बाब इतर गावांतील नातेवाइकांना कळविल्याने उघडकीस आली आहे.

खामगाव तालुक्यातील बोथा काजी येथे गेल्या काही दिवसांपासून त्या कुटुंबाला अशी वागणूक दिली जात आहे. 
गावातील ३५ वर्षीय तरुण नोकरीनिमित्त बाहेरगावी होता. प्रकृती बिघडल्याने तो गावात आला. गावात आल्यानंतर कुटुंबातील सेवानिवृत्त वडिलांची प्रकृती बिघडली. दोघांनाही अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एका दिवसाच्या अंतराने दोघांचाही काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबात असलेल्या दोन महिला व दोन मुलांनी बोथा काजी गावातील घरी दु:खात दिवस काढणे सुरू केले. या काळात त्यांना धीर देण्यासोबतच मदतीचा हात मिळणे आवश्यक असताना त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळणेही कठीण झाले.  थंड पाण्याचे कॅन, दळण, किराणा तसेच इतरही जीवनावश्यक गरजा भागविणाऱ्यांनी त्यांना नकार देण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे कुटुंब गावातच कसेबसे दिवस काढत आहे. गावातील या परिस्थितीबाबत त्यांनी नातेवाइकांना माहिती दिली. त्यामुळे काहींनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जीवनावश्यक गरजा भागविणाऱ्यांना समजावून कोण सांगणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे, गावात या कुटुंबासोबतच इतरही दोन कुटुंबांतील सदस्य कोरोना पाॅझिटिव्ह आहेत. त्या कुटुंबांबद्दल जीवनावश्यक पुरवठादारांकडून सहानुभूती दाखवली जात आहे, तर या कुटुंबात दोन मृत्यू झाल्याने त्यांना सुविधा देण्यास नकारघंटा आहे. त्यामुळे या कुटुंबावर दुहेरी आघात सहन करण्याची वेळ आली आहे. 

भीतीने बोलण्यास नकार
 दरम्यान, या कुटुंबातील संबंधितांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गावपातळीवरचा विषय आहे. 
 आज ना उद्या परिस्थिती सुधारेल, या आशेवर बोलण्यास नकार दिला. 


बाहेरगावी असलेल्या आरओ प्लांटकडून त्यांना पाणी देण्यास नकार दिला होता. ही समस्या आपण त्यांच्याशी बोलून सुरळीत केली. उर्वरित जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत त्यांनी माहिती दिल्यास ती समस्याही निकाली काढता येईल. 
- सोपान तुंबडे, 
पोलीस पाटील, 
बोथा काजी.

एकाचवेळी कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी धास्ती घेतली होती. त्यानंतर खबरदारीच्या सर्वच उपाययोजना केल्या. कुटुंबाच्या घरात फवारणी केली. तसेच इतरही मदतीसंदर्भात माहिती मिळाल्यास ती ग्रामपंचायत प्रशासनाकडून केली जाईल. 
-अलका उद्धव म्हस्के, 
सरपंच, बोथा काजी.

Web Title: Unannounced boycott of the village on the family of the two who died due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.