'समृद्धी'वर चालकाला लागली डुलकी; भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:38 IST2025-04-24T13:38:15+5:302025-04-24T13:38:15+5:30
भीषण अपघातात चालक विकास कुमार आणि त्याचा सहप्रवासी गुड्डू सिंग या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

'समृद्धी'वर चालकाला लागली डुलकी; भीषण अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील नागपूर कॉरिडोरवर बुधवारी सकाळी झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात चालकाला डुलकी लागल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे.
ठाणे येथून बिहारकडे जात असलेल्या कारचा चालक विकास कुमार प्रभूसिंग याला डुलकी लागल्याने महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या मीडियमवर आदळली. त्यानंतर कार पुलाच्या कठड्यावर धडकली. या भीषण अपघातात चालक विकास कुमार आणि त्याचा सहप्रवासी गुड्डू सिंग या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या कारमध्ये प्रवास करत असलेले प्रदीप सुरेश चव्हाण, मनीष कुमार प्रेमचंद सिंग आणि नितेश कुमार हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत व पोलिस कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तत्काळ उपाययोजना करत वाहतूक सुरळीत केली.